लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : धारावी आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची... अदानी हटाओ, धारावी बचाव... अशा घोषणांनी शनिवारी बीकेसी परिसर दणाणून गेला. धारावीच्या पुनर्विकासाच्या विरोधात ठाकरे गटाच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या सर्वपक्षीय मोर्चाला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. महिलांचा यात लक्षणीय सहभाग होता. कोळी बांधवही पारंपरिक वेशात सहभागी झाले होते.
अदानी समूहाऐवजी सरकारने स्वत: धारावीचा विकास करावा, या मागणीसाठी मुंबईतील अदानी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चात शिवसैनिकांसह महाविकास आघाडी आणि डाव्या पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी धारावी आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.प्रत्येक वेळी अदानींवर सवलतींचा वर्षाव केला जातो, धारावीकरांना किती सवलती दिल्या, असे खा. विनायक राऊत म्हणाले.
धारावीच्या मोर्चात संपूर्ण महाराष्ट्रातून लोक बोलावले असून धारावीमधील लोक कमी आहेत. ज्या लोकांना धारावीचा विकास नको आहे त्यांनी हा मोर्चा काढला आहे. त्यांना जनता जशास तसे उत्तर देईल. अहंकारी लोकांना जमिनीवर आणण्यासाठी शिवपुराण कथेची गरज आहे. सामान्य घरातून मी मुख्यमंत्री झालो आहे त्यामुळे सामान्य माणसाचे, शेतकरी, कष्टकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करतो. - एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
राज्य सरकारकडून अदानींसाठी रोज एक नवीन जीआर आणला जातो. त्यांना सवलती दिल्या जातात. या प्रकल्पाचा कालावधी १७ वर्षांचा असून प्रकल्पपूर्तीस उशीर केला तर प्रतिवर्ष दोन कोटी रुपये दंड आहे. परंतु या प्रकल्पातून एक लाख कोटींचा अदानींना नफा मिळणार आहे. त्यामुळे या प्रकल्पासाठी वेळमर्यादा निश्चित करण्यात यावी. धारावी पुनर्विकासात अपात्र ठरणाऱ्यांना दहा किमी पुढे सशुल्क किंवा भाड्याने घरे दिली जाणार आहेत. धारावीकरांना मुंबईबाहेर काढण्याचा हा डाव आहे. - ॲड. राजेंद्र कोरडे, समन्वयक, धारावी बचाव आंदोलन.
जेव्हा स्वत:ची निष्क्रियता सक्रियतेकडे दाखवण्याचा प्रयत्न करायचा असतो, तेव्हा असा प्रयत्न केला जातो. मुंबईकर, धारावीकर विकासाची वाट पाहायचे. त्यांना या पुनर्विकासाचा मोठा फायदा होणार आहे. सरकारने त्यांची पद्धत स्पष्ट केली आहे. पारदर्शक पद्धतीने सर्व बाबी घडत असताना त्यांच्या काळात झालं नाही, त्यांच्या काळात धारावी पुनर्विकास करू शकले नाहीत म्हणून उद्धव ठाकरेंना शल्य वाटत आहे. म्हणून ते मोर्चा काढत आहेत. - चंद्रशेखर बावनकुळे, भाजप प्रदेशाध्यक्ष.