स्नेहा मोरे, लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई: अयोध्येत रामलल्ला विराजमान झाल्यानंतर प्रथमच येणाऱ्या रामनवमीचे औचित्य साधत मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांनी विविध उपक्रमांचे आयोजन केल्याचे चित्र सर्वत्र आहे. पदयात्रा, पालखी, रामरथ, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम, महाआरती यांचे आयोजन केल्याचे दिसून येत आहे.
रामनवमीला मंदिर परिसरात ३७० भक्तांच्या उपस्थितीत श्रीरामाच्या आरतीचे आयोजन करण्याच्या सूचना मुंबई भाजपने कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. याविषयी मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आवाहनवजा सूचना दिल्या आहेत. भाजपकडून मतदारसंघांतील कार्यकर्त्यांना आधीच सूचना दिल्याने स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून विविध मंदिरांच्या भेटी घेऊन आरती, पूजापाठ, होमहवन अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भाजपकडून अनेक कार्यक्रमही आयोजित केले आहे. रामनवमीच्या उत्सवांचे भव्य आयोजन व्हावे या हेतूने दोन दिवसांपूर्वीच लोढा यांनी पोलिस आयुक्तांची भेट घेत परवानगीचा मार्गही मोकळा केला आहे.
दक्षिण मुंबई मतदारसंघातील उद्ववसेनेचे उमेदवार अरविंद सावंत वरळी, शिवडी परिसरांतील स्थानिक उत्सवांत सहभागी होणार आहेत. त्यात वरळी येथे विशेष आरतीचे आयोजन करण्यात आले आहे, तर शिवडी येथे अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती तयार करून स्थानिक रहिवासी पदयात्रा काढणार आहेत, अशी माहिती उद्धवसेनेचे लोकसभा समन्वयक सुधीर साळवी यांनी दिली. भायखळा परिसरातील मंदिरांमध्ये महायुतीतील शिंदेसेनेच्या यशवंत जाधव यांच्या नेतृत्त्वाखाली अनेक सांस्कृतिक - धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात वयोगटांप्रमाणे नवमतदारांसाठी व गृहिणींसाठी रांगोळी, कला स्पर्धांचे आयोजन केले आहेत. त्यामुळे या माध्यमातून मतदारांचे लक्ष वेधून घेण्यासाठी, मतदारांशी गाठभेट, संवादासाठी उमेदवारांसह नेत्यांना चांगलीच संधी मिळणार आहे. दक्षिण मुंबईतील मुंबादेवी, कुलाबा परिसरातील प्राचीन मंदिरांमध्ये अयोध्येतील रामाच्या पूजेच्या वेळी आरतीचे आयोजन करण्यात आले.