"अंधेरीतील NOTA ची मतं पाहून सर्वच राजकीय पक्षांनी आत्मचिंतन करायला हवं"
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2022 07:24 PM2022-11-06T19:24:42+5:302022-11-06T19:29:38+5:30
याबाबत शिंदे गटाचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनीही भूमिका मांडली. तसेच, असा आरोप करणे चुकीचे असल्याचे सामंत यांनी म्हटलं आहे.
मुंबई - अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघासाठी पार पडलेल्या पोटनिवडणुकीत शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार ऋतुजा लटके (Rutuja Latke) या विजयी झाल्या आहेत. ऋतुजा यांनी केवळ बहुमतच मिळाले नसून दिवंगत पती रमेश लटके यांचा विक्रमही त्यांनी मोडला आहे. या निवडणुकीत नोटालाही जास्त मिळाली. नोटाला १२ हजारांपेक्षा अधिक मत मिळाली आहेत, यावरुन आताल आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. नोटाल मिळालेली मतं ही भाजपचीच असल्याचा आरोप शिवसेनेनं केला आहे. याबाबत शिंदे गटाचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनीही भूमिका मांडली. तसेच, असा आरोप करणे चुकीचे असल्याचे सामंत यांनी म्हटलं आहे.
शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी नोटाला मिळालेल्या मतावरुन उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. तर, भाजप नेते आशिष शेलार (BJP Ashish Shelar) यांनी विजयानंतर ऋतुजा लटके यांचं अभिनंदन केलं आहे. तसेच "भाजपाच्या मदतीमुळे ऋतुजा लटकेंचा अंधेरी पूर्वमध्ये विजय" असंही म्हटलं आहे.
अंधेरी पोटनिवडणुकीत ठाकरे गटाच्या उमेदवार लटके 66 हजारांच्या वर मते घेत निवडून आल्या आहेत. मात्र, या निवडणुकीत नोटाला 12 हजारांच्या वर मते मिळाली आहेत. भाजपने ही मते पैशाने फिरवली असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. त्यावर मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया देताना, नोटाला मिळालेली मते भाजपने फोडली म्हणणे चुकीचे आहे, या मतांची टक्केवारी पाहता सर्व पक्षांनी आत्मचिंतन करणे गरजेचे आहे, असे सामंत यांनी म्हटले. तसेच, मी लटके यांचे अभिनंदन करतो, असेही सामंत म्हणाले.
आशिष शेलार यांनीही केलं अभिनंदन
आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "भाजपाच्या मदतीमुळे मा. ऋतुजा लटके यांचा अंधेरी पूर्व मध्ये विजय...ऋतुजाताईंचे अभिनंदन!! काँग्रेस, राष्ट्रवादी, भाकप डझनभर पक्षांनी पाठींबा देऊन ही शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाला ना मतदान जास्त झाले, ना मतं जास्त मिळाली. भाजपाने निवडणूक लढवली असती तर यांचा पराभव निश्चित होता!" असं शेलार यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
शीतल म्हात्रेंची शिवसेनेवर बोचरी टीका
शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी ट्विट करुन उद्धव ठाकरे गटावर टीका केली आहे. "आतापर्यंतच्या भारतातील इतिहासात प्रथमच पोटनिवडणुकीत NOTA ला एवढी जास्त मतदारांची पसंती मिळाली आहेत..याचा अर्थ शिल्लकसेनेला नक्कीच कळत असावा...' असं ट्विटमध्ये शीतल म्हात्रे यांनी म्हटले आहे.