मतदारराजा तुझ्याचसाठी सर्व तयारी; मतदान प्रक्रियेसाठी शहर जिल्हा प्रशासन सज्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2024 05:59 AM2024-05-18T05:59:26+5:302024-05-18T06:00:00+5:30
मुंबईतील मतदान प्रक्रियेसाठी शहर जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई :मुंबईतील मतदान प्रक्रियेसाठी शहर जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून, लोकशाहीच्या या उत्सवात सर्व मतदारांनी उत्स्फूर्त सहभाग घ्यावा, असे आवाहन मुंबई शहराचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी केले आहे. सोमवारी, दि.२० मे रोजी शहरातील दक्षिण आणि दक्षिण मध्य मतदारसंघातील एकूण २४ लाख ९० हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
मतदान सुरळीत व्हावे यासाठी शहर जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून, त्यासंदर्भातील माहिती गुरुवारी पत्रकार परिषदेत देण्यात आली. मुंबई शहर जिल्ह्यात मतदानासाठी १५ हजार कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. मतदान केंद्रांवर पिण्याच्या पाण्याची, तसेच प्रसाधनगृहाची सोय केली जाणार असून, दिव्यांग मतदारांसाठी रॅम्पची उभारणी केली जाणार असल्याचे यादव यांनी सांगितले. व्हीलचेअरचीही व्यवस्था केली जाणार आहे. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रात मोबाइल नेण्यास मनाई असेल. मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात आतापर्यंत सुमारे ३१० ज्येष्ठ नागरिक मतदार व ०९ दिव्यांग मतदारांनी मतदान केले, तर मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघात ५८४ ज्येष्ठ नागरिक मतदार व ४८ दिव्यांग मतदारांनी गृह मतदान केले आहे.
मतदार यादीत नाव तपासून घ्या
मतदार यादीत तुमचे नाव आहे की नाही, हे पाहण्यासाठी https://voters.eci.gov.in/ या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन यादव यांनी केले.
मतदान केंद्रांची माहिती
एकूण मतदान केंद्रे : २ हजार ५२०
एकूण साहाय्यकारी मतदान केंद्रे : ०८
एकूण सखी महिला मतदान केंद्रे : ११
नवयुवकांसाठी मतदान केंद्रे : ११
दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्रे : ०८
मतदारांचा लेखाजोखा
२४,९०,२३८ एकूण मतदार
१८ ते १९ या वयोगटातील नवमतदार
एकूण मतदार : २६ हजार ४५०
दिव्यांग मतदार : ५,५४९