मुंबईतील सगळे प्रकल्प कलानगर आणि वरळीतच जातात - आशिष शेलार; मुंबईच्या प्रश्नांवर एच पश्चिम वाॅर्ड कार्यालयावर भाजपचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:06 AM2021-09-03T04:06:19+5:302021-09-03T04:06:19+5:30

मुंबई : मुंबई महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेला मुंबईत कलानगर आणि वरळी हे दोनच भाग दिसतात. जे प्रकल्प येतात ते या ...

All projects in Mumbai go to Kalanagar and Worli - Ashish Shelar; BJP's march on H West ward office on Mumbai issues | मुंबईतील सगळे प्रकल्प कलानगर आणि वरळीतच जातात - आशिष शेलार; मुंबईच्या प्रश्नांवर एच पश्चिम वाॅर्ड कार्यालयावर भाजपचा मोर्चा

मुंबईतील सगळे प्रकल्प कलानगर आणि वरळीतच जातात - आशिष शेलार; मुंबईच्या प्रश्नांवर एच पश्चिम वाॅर्ड कार्यालयावर भाजपचा मोर्चा

Next

मुंबई : मुंबई महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेला मुंबईत कलानगर आणि वरळी हे दोनच भाग दिसतात. जे प्रकल्प येतात ते या दोन भागातच जातात. मग बाकीचे मुंबईकर काय सवतीचे आहेत का, असा प्रश्न करत भाजप नेते, आमदार आशिष शेलार यांनी गुरूवारी शिवसेनेवर टीका केली.

मुंबईकरांच्या विविध प्रश्नांवर मुंबई भाजपतर्फे आज पालिकेच्या वाॅर्ड ऑफिस कार्यालयांवर मोर्चे काढण्यात आले होते. एच पश्चिम पालिका कार्यालयावर आमदार आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. यावेळी मुंबईतील विविध प्रश्नांवरुन पालिकेच्या सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करत शेलार यांनी आम्ही मुंबईकरांचे प्रश्न मांडणार, कामांचा हिशेब सत्ताधाऱ्यांना द्यावा लागणार, असा इशारा दिला. मुंबई महापालिकेचा दरवर्षीचा अर्थसंकल्प साधारण ३० हजार कोटींचा असतो. यानुसार मागील पाच वर्षांत सरासरी १ लाख ५० हजार कोटी रुपये खर्च झाले. इतका खर्च करूनही ना रस्ते, ना पाणी ना अन्य सुविधा मिळाल्या. त्यामुळे कुठे गेला हा पैसा, या पैशांचा हिशेब सत्ताधाऱ्यांना द्यावाच लागेल, असे शेलार यावेळी म्हणाले.

यावेळी भाजपच्यावतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आले. यात तौक्ते वादळ व अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या मुंबईकरांना तातडीने मदत देण्यात यावी,कोरोनामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या मुंबईकरांना पाणीपट्टी, अग्नीशमन कर, अंतर्गत रस्ते कर आदींमध्ये किमान ५० टक्के सवलत देण्यात यावी, निवडणूक प्रचारावेळी आश्वासित केल्याप्रमाणे ५०० चौ. फुटापर्यंतच्या सर्व सदनिकांना मालमत्ता कर माफ करावा, पुरेसे पाणी, खडेमुक्त रस्ते मिळालेच पाहिजेत अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.

मुंबईकर आर्थिक अडचणीत असतानासुद्धा राज्य सरकारने किंवा ८० हजार कोटी रुपयांच्या ठेवी असलेल्या आणि दरवर्षी १६०० कोटी रुपये केवळ व्याजापोटी उत्पन्न असलेल्या मुंबई महानगरपालिकेकडून कोणतीही मदत देण्यात आली नसल्याने या मागण्या करण्यात आल्याचे शेलार म्हणाले. या आंदोलनात वांद्रे पश्चिमचे भाजप अध्यक्ष किशोर पुनवत, नगरसेविका अलका केरकर, स्वप्ना म्हात्रे, हेतल गाला, विरेंद्र म्हात्रे, तृणाल वाघ, प्रवीण क्षीरसागर आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Web Title: All projects in Mumbai go to Kalanagar and Worli - Ashish Shelar; BJP's march on H West ward office on Mumbai issues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.