बीकेसीचा सर्वांगीण विकास करणार
By admin | Published: May 28, 2015 12:51 AM2015-05-28T00:51:10+5:302015-05-28T00:51:10+5:30
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक असणाऱ्या मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलात (बीकेसी) भविष्यातील व्यापाराच्या दृष्टीने सर्वच सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील
मुंबई : राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक असणाऱ्या मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलात (बीकेसी) भविष्यातील व्यापाराच्या दृष्टीने सर्वच सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आपली मोलाची भूमिका बजावेल, अशी हमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
रिलायन्सतर्फे वांद्रे-कुर्ला संकुलात उभारण्यात आलेल्या ‘जिओ गार्डन’चे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले; या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी बॉलीवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, अंजली तेंडुलकर, जॉन अब्राहम, अभिषेक बच्चन, रणबीर कपूर, एमएमआरडीएचे आयुक्त यू.पी.एस. मदान यांच्यासह रिलायन्सचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी आणि त्यांच्या पत्नी नीता अंबानी उपस्थित होत्या. शिवाय या वेळी रिलायन्स फाउंडेशनतर्फे यंग चॅम्प्स एक्झिबिशन फुटबॉल सामनाही थंडरिंग ब्लू आणि रेगिंग रेड या दोन संघांत खेळविण्यात आला. रेगिंग संघाने तीन गोल करत विजय प्राप्त केला, तर थंडरिंग संघाला केवळ एकच गोल करता आला.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, वांद्रे-कुर्ला संकुलात व्यापाराच्या दृष्टीने संस्था उभ्या राहत आहेत आणि त्यात भरही पडत आहे. मात्र आपणाला आर्थिकदृष्ट्या संपन्न व्हायचे असेल तर वांद्रे-कुर्ला संकुलात अधिकाधिक वित्त केंद्रे उभारणे गरजेचे आहे. एमएमआरडीए याबाबत उल्लेखनीय पावले उचलत आहे. कन्व्हेन्शन सेंटरही येथे उभारण्यात येणार आहे. तर अमिताभ बच्चन यांनी थंडरिंग ब्लू आणि रेगिंग रेड संघातील फुटबॉलपटूंचे कौतुक केले. तुमचा खेळ प्रेरणादायी होता, असे म्हणत बालखेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
नीता अंबानी यांनीही या वेळी उपस्थित खेळाडूंचे कौतुक करत त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. तर अभिषेक, जॉन आणि रणबीर यांनीही या खेळाडूंचे स्वागत करत त्यांचा हुरूप वाढवला. (प्रतिनिधी)