पालिका शाळांतून होतोय विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास; पीयूष गोयल यांचे उद्गार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2024 08:21 AM2024-10-07T08:21:03+5:302024-10-07T08:21:45+5:30
नवीन राष्ट्रीय धोरणातून विद्यार्थ्यांना कौशल्याधारित रोजगाराभिमुख अभ्यासक्रमाचे धडे दिले जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : काळाशी सुसंगत आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने अत्याधुनिक साधनांच्या साहाय्याने मुंबई पालिका शाळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन केले जात आहे, असे उद्गार केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी काढले. मालाड पश्चिमेकडील मीठ चौकी, जोड मार्गावरील उड्डाणपुलाची एक मार्गिका आणि नवीन बांधलेल्या मालवणी टाऊनशिप महानगरपालिका शालेय इमारतीचे लोकार्पण मंत्री गोयल यांच्या उपस्थित रविवारी करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
नवीन राष्ट्रीय धोरणातून विद्यार्थ्यांना कौशल्याधारित रोजगाराभिमुख अभ्यासक्रमाचे धडे दिले जात आहे. त्यामुळे महाराष्ट्रातच नाही, तर देशात नावलौकिक मिळविलेल्या पालिकेच्या शाळांची गुणवत्तापूर्ण शिक्षण हीच ओळख असल्याचे गोयल म्हणाले. नव्या शैक्षणिक धोरणात पूर्वप्राथमिक आणि प्राथमिक स्तरावर अभ्यासाचा विचार करता ज्या गोष्टींचा विकास होऊ शकतो, त्याचा सर्वाधिक विकास करण्याचा विचार केला आहे. मालवणी टाऊनशिप शाळा संकुल इमारतीत अशाप्रकारे अनुभवावर आधारित शिक्षणाला अनुरूप वातावरण तयार करण्यात आले आहे, असेही गोयल म्हणाले.
या सोहळ्यास आमदार अस्लम शेख, आमदार योगेश सागर, पालिका आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त पालिका आयुक्त डॉ. अमित सैनी, अतिरिक्त पालिका आयुक्त अभिजित बांगर यांची उपस्थिती होती. परिमंडळ ४ चे सहआयुक्त विश्वास शंकरवार, शिक्षण विभागाच्या उपायुक्त डॉ. प्राची जांभेकर, पायाभूत सुविधांचे उपायुक्त उल्हास महाले, पी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर, नागरिक उपस्थित होते.
काँग्रेस-भाजप कार्यकर्ते आमने-सामने
मीठ चौकी उड्डाणपुलाचे भूमिपूजन आघाडी सरकारच्या काळात झाले आहे. त्यामुळे लोकार्पणही स्थानिक आमदार अस्लम शेख यांच्या हस्ते करावे, अशी मागणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली. काँग्रेस कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीमुळे कार्यक्रमाच्या ठिकाणी काही काळ तणाव निर्माण झाला होता. काँग्रेस व भाजपचे कार्यकर्ते यावेळी आमने-सामने आले होते. मात्र, पोलिसांनी तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणली. रविवारी सकाळी नऊ वाजेपासून काँग्रेस कार्यकर्ते मीठ चौकी उड्डाणपुलापाशी मोठ्या संख्येने जमायला सुरुवात झाली होती. या उड्डाणपुलाचे श्रेय घेण्याचा कोणी प्रयत्न करू नये, असे आ. शेख यांनी सांगितले.