Join us  

तर महाराष्ट्राच्या सर्व योजना मंजूर

By admin | Published: October 12, 2014 11:30 PM

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. ठाणे ही तिची सॅटेलाइट मेगासिटी आहे. काँग्रेसच्या राजवटीने देशाला गेल्या १५ वर्षांत आर्थिक दुर्दशेत नेऊन ठेवले आहे

ठाणे : मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. ठाणे ही तिची सॅटेलाइट मेगासिटी आहे. काँग्रेसच्या राजवटीने देशाला गेल्या १५ वर्षांत आर्थिक दुर्दशेत नेऊन ठेवले आहे. त्यातून भारताला संपन्न आणि सुदृढ करण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी मुंबई आणि महाराष्ट्राच्या सत्तेची आवश्यकता आहे. म्हणून महाराष्ट्रात भाजपाला पूर्ण बहुमत द्या. रेल्वेचा कायापालट करण्यासाठी मी रेल्वेमध्ये १०० टक्के थेट विदेशी गुंतवणुकीला अनुमती देईल, असे भरघोस आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठाण्यातील प्रचारसभेत दिले. मात्र, त्यांनी या वेळी शिवसेनेवर एका शब्दानेही टीका केली नाही किंवा तिचा उल्लेखही केला नाही. गेल्या २५ वर्षांनंतर भाजपाच्या कमळावर मतदानाचा शिक्का उमटवण्याचे सौभाग्य महाराष्ट्राच्या जनतेला प्रथमच लाभले आहे. त्याचा पुरेपूर वापर करा, असे ते म्हणाले. गेल्या १५ वर्षांत देशाची आर्थिक राजधानी आणि विकासाचे प्रमुख केंद्र असलेल्या महाराष्ट्र आणि मुंबईची काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने पार वाट लावली. यांच्याकडे राज्याचे प्रश्न सोडविण्याचा एकच इलाज होता. तो म्हणजे मुख्यमंत्री बदलणे आणि बदलून-बदलून मुख्यमंत्री करणार तरी कोणाला तर माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलांना! मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीचा हा खो-खो थांबविण्याची संधी तुम्हाला लाभली आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून ६७ वर्षे झाली. तरी हे काँग्रेसचे सरकार दीडशे वर्षांपूर्वीची रेल्वे यंत्रणा अजूनही वापरते आहे. त्यामुळे कोकण, मुंबई-ठाणेकरांच्या नशिबी नरकयातना वाटाव्या, असा प्रवास आला आहे. तो थांबविण्यासाठी व सुखावह करण्यासाठी रेल्वेचा कायापालट करण्याची गरज आहे. त्यासाठी प्रचंड भांडवल लागणार आहे. ते उपलब्ध व्हावे, यासाठी मी रेल्वेत १०० टक्के थेट विदेशी गुंतवणुकीला मंजुरी देणार आहे. त्यातून १०० अब्ज डॉलर्स रेल्वेच्या विकास आणि प्रगतीसाठी उपलब्ध होणार आहेत. जपान, चीन, अमेरिका, जर्मनी हे रेल्वे तंत्रज्ञानातले सुपर पॉवर आणि सुपर एक्स्पर्ट समजले जातात. ते त्यांचे तंत्रज्ञान अर्थसहाय्यासह देण्यास तयार आहेत. ते म्हणाले, राज्यात काँग्रेसचे सरकार, केंद्रात काँग्रेसचे सरकार असतानाही महाराष्ट्राच्या अनेक योजना रखडल्या होत्या. भाजपाला महाराष्ट्रात बहुमत द्या, या सगळ्या योजना मी मंजूर करतो.