समुद्रात चौघेजण बुडाले, एकाचा मृत्यू
By Admin | Published: August 17, 2015 12:09 AM2015-08-17T00:09:37+5:302015-08-17T00:09:37+5:30
सर्व तरुण पुण्यातील : गणपतीपुळे व गुहागर येथील घटना
गुहागर/गणपतीपुळे : गुहागर समुद्रकिनारी आणि गणपतीपुळे येथे दोन वेगवेगळ्या घटनेत चौघेजण बुडाले होते, त्यापैकी तिघाजणांना वाचवण्यात यश आले, तर एकाचा बुडून मृत्यू झाला आहे. मोहीत कौशिक (वय २३) असे मृत तरुणाचे नाव असून, तो पुण्याचा आहे.पहिली घटना गणपतीपुळे समुद्रकिनारी घडली. मोहीत कौशिक, राकेशचंद्र शर्मा (२३), आकाश रवींद्रकुमार शिण्णोई (२२), शुभम शर्मा, दीपाली जैसवाल (२३), रजत गुप्ता (२३) हे पाचही जण पुणे येथील हिंजवाडी येथे सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करतात. स्वातंत्र्यदिनाची सुट्टी असल्याने हे सर्व मित्रमैत्रिणी फिरायला गणपतीपुळे येथे आले होते. दुपारी ३.३० वाजता ते समुद्रात पोहण्यासाठी उतरले. यातील मोहीत कौशिक शर्मा व रजत गुप्ता हे बुडू लागल्यामुळे येथील स्थानिक व्यापाऱ्यांनी त्यांना बाहेर काढण्यासाठी समुद्रात उड्या घेतल्या. मात्र तोपर्यंत मोहीत कौशीक हा पूर्णपणे पाण्याच्या प्रवाहात अडकला होता. त्याला प्रथम बाहेर काढण्यात आले. नाकातोंडामध्ये प्रचंड पाणी गेल्याने त्याला आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले, तर रजत गुप्ता याच्यावर तातडीचे उपचार करत त्याला पुढील उपचारासाठी रत्नागिरी येथे पाठविण्यात आले. त्याची तब्येत सुधारत आहे.मोहीत कौशीक शर्मा याचे नातेवाईक दिल्लीवरून या ठिकाणी येण्यासाठी निघाले असल्यामुळे त्याचे शव रत्नागिरी येथील जिल्हा रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आले आहे. या घटनेची खबर मिळताच जयगडचे पोलीस निरीक्षक रवींद्र साळोखे यांनी तातडीने घटनास्थळाला भेट देत परिस्थितीची पहाणी केली.दसरी घटना गुहागर समुद्रकिनारी घडली. गुहागर समुद्रकिनारी जेटीजवळील भागात स्वातंत्र्यदिनी सायंकाळी ४ वाजता चिपळूण कळवंडे (सध्या पुणे) येथील सिद्धेश सदानंद उदेक (१६) व सुरेश सदानंद उदेक (१८) या बुडालेल्या सख्ख्या भावांना मालघर येथील तरुणांनी वाचविले. चिपळूण लाईफ केअर रुग्णालयामध्ये सायंकाळी दाखल केल्यानंतर दोघांचीही प्रकृती सुस्थितीत असून एकाला घरी सोडण्यात आले.मूळ चिपळूण कळवंडे येथील सध्या पुणे येथे असणाऱ्या सदानंद उदेक यांच्याकडे पुण्यामधील मित्रमंडळी आली होती. शनिवारी सायंकाळी ४ च्या सुमारास ते गुहागर चौपाटीवर आले. जेटीजवळ पाण्यात सिद्धेश व सुरेश या सख्ख्या भावांबरोबर अन्य मित्रही पोहत असताना ओहोटी व लाटांच्या माऱ्यामुळे यामध्ये दोघे बुडू लागले. आरडाओरडा सुरू असताना मालघर येथील सूरज वाजे, किरण घोले, अनिकेत खेडेकर, विकी वाजे, विराज वाजे, यतिन घोले, अभिषेक किळंजे या तरुणांनी त्यांना बुडताना पाहिले. तत्काळ या दोघांना बाहेर काढत बेशुद्ध अवस्थेतच दुचाकीने गुहागर ग्रामीण रुग्णालयात आणले. याचवेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. बलवंत यांच्यासह डॉ. नीलेश ढेरे, डॉ.भाले एकत्रित बैठक चालू असल्याने एकाचवेळी सापडले. तत्काळ प्रथमोपचार सुरू करत धोका टळल्याचे लक्षात आल्यानंतर शासकीय रुग्णवाहिकेने चिपळूण येथील लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये अधिक उपचारासाठी दाखल केले. आज २४ तासानंतर दोघांचीही प्रकृ ती सुस्थितीत असून, एकाला घरी सोडल्याचे रुग्णालयाचे डॉक्टरांनी सांगितले. (प्रतिनिधी)
दीड वर्षातील पहिली घटना
डिसेंबर २०१३ या वर्षी या समुद्रामध्ये बुडून मृत्यू पावल्याची घटना घडली ती शेवटची. त्यानंतर त्यावेळचे पोलीस हेड कॉन्स्टेबल नाना शिवगण यांनी या बुडणाऱ्यांना वाचवण्यात किनाऱ्यावरील व्यावसायिकांना योग्य ते मार्गदर्शन करत त्यांनी त्या स्थानिक तरुणांची एक टीमच कार्यरत केली. त्यावेळेपासून कालपर्यंत पर्यटक बुडाले, मात्र सर्वांना वाचवण्यात यश आले होते. बुडून मृत होण्याची ही घटना पहिलीच आहे.