मुंबई - शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाचे सादरीकरण झाले. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना नाव न घेता टोला लगावला. बाळासाहेबांच्या स्मारकामध्ये केवळ शिवसेनेचेच सर्व मुख्यमंत्री दिसतील, असे विधान उद्धव ठाकरे यांनी केले.
बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचं सादरीकरण केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे म्हणाले की, बाळासाहेबांच्या स्मारकामध्ये शिवसेनेचेच सर्व मुख्यमंत्री दिसतील. शिवसेनेचं नाव घेऊन तोतयेगिरी करणारे नसतील, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. यावेळी माईक देण्याचा संदर्भ देत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. एकदा बोलून झालं की मी सुभाष देसाईंकडे माईक देतो. म्हणजे एकदा माईक दिला की तो पुन्हा घ्यावा लागणार नाही, असे ते म्हणाले.
यावेळी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाबाबत उद्धव ठाकरे म्हणाले की, बाळासाहेबांचं स्मारक हे प्रेरणा देणारं असेल. हे केवळ संग्रहालय नसेल तर ते स्फूर्तिस्थान असेल. येथील ऐतिहासिक बांधकामाला धक्का न देता स्माकरकाचं काम होणार आहे. तसेच येथून जवळच समुद्र किनारा असल्याने योग्य ती काळजी घेण्यात येणार आहे. या स्मारकामध्ये बाळासाहेबांचा पुतळा नसेल. मात्र आवश्यक वाटलं तर पुतळ्याचाही समावेश होईल. मात्र आतातरी आमचा फोकस हा पुतळ्यावर नाही आहे. कारण एकदा पुतला आला की इतर गोष्टी मागे पडतात.