Join us  

Rajya Sabha Election 2022: शिवसैनिक हॉटेलबाहेर आमदारांवर ठेवणार नजर; उद्धव ठाकरेंची खास रणनीती, चुरस वाढली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2022 1:57 PM

राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेनेनं खास रणनीती आखली आहे.

मुंबई-  राज्यसभा निवडणुकीच्या सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात उतरल्याने चुरस वाढली आहे. या निवडणुकीत भाजपाचे दोन आणि काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा प्रत्येकी एक उमेदवार निवडून येणार हे निश्चित आहे. तर भाजपाचा तिसरा आणि शिवसेनेच्या दुसऱ्या उमेदवारामध्ये सहाव्या जागेसाठी चुरस आहे. निवडून येण्यासाठी आवश्यक असलेला ४२ मतांचा कोटा दोन्ही उमेदवारांकडे नसल्याने छोटे पक्ष अपक्षांवर त्यांची मदार आहे.

राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेनेनं खास रणनीती आखली आहे. शिवसेनेच्या सर्व आमदारांची वर्षावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत बैठक होणार आहे.  या बैठकीत उद्धव ठाकरे सर्व आमदारांना विश्वास देणार असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच या निवडणूकीत कोणताही दगा फटका होऊ नये, त्यामुळे महाविकास आघाडीने सर्व आमदारांना एकत्र हॉटेलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे हॉटेलमध्ये शिवसेनेच्या आमदारांवर शिवसैनिक नजर ठेवणार आहे. शिवसेना कार्यकर्त्यांची फौज हॅाटेलच्या चारही बाजूला असतील, अशी माहिती समोर येत आहे. 

राज्यसभा निवडणुकीसाठी भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा संघर्ष उभा ठाकला आहे. दोन्ही बाजूंकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत निवडणुकीच्या तयारीची बैठक रविवारी झाली. राज्यसभा निवडणुकीची पूर्वतयारी झाली असून, सर्व रणनीती, कार्यपद्धतीची ब्लू प्रिंट तयार असल्याचे भाजप नेते आशिष शेलार यांनी सांगितले आहे. महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीसाठी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भाजपने निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.

दरम्यान, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडे मिळून २६ अतिरिक्त मतं आहेत. मात्र उर्वरित १६ मतांसाठी त्यांना महाविकास आघाडीला पाठिंबा देणारे अपक्ष, छोटे पक्ष आणि इतरांच्या पाठिंब्याची गरज आहे. तर भाजपाकडे स्वत:ची २२ अतिरिक्त मतं असून, अन्य ७ आमदारांचा पाठिंबा धरता एकूण २९ मते आहेत. उर्वरित १३ मतांसाठी भाजपाचा महाविकास आघाडीचे मित्र असलेले छोटे पक्ष आणि अपक्षांवर डोळा आहे. 

हितेंद्र ठाकूर यांनी महाविकास आघाडीसह भाजपाचही टेन्शन वाढवलं-

राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे राज्यसभेचे उमेदवार धनंजय महाडिक यांनी रविवारी सकाळी बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा आमदार हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली. त्यानंतर शिवसेनेचे नेते सुनील राऊत, खासदार राजन विचारे यांनी देखील हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली. शिवसेनेचे नेते आणि हितेंद्र ठाकूर यांच्यात जवळपास ४ तास बंद दाराआड चर्चा झाली. 

सदर बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, कोणता निर्णय झाला, याबाबत मात्र बोलणे टाळलं आहे. मात्र हितेंद्र ठाकूर यांनी मोजकचं भाष्य करत महाविकास आघाडीसह भाजपाचही टेन्शन वाढवलं आहे. आपण आपली भूमिका राज्यसभेच्या मतदानाच्यादिवशीच ठरवू, असं हितेंद्र ठाकूर यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :उद्धव ठाकरेशिवसेनाराज्यसभामहाराष्ट्र विकास आघाडीमहाराष्ट्र सरकार