‘मिशन बिगिन अगेन’, मुंबईतील सर्व दुकाने आजपासून सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2020 05:45 AM2020-08-04T05:45:51+5:302020-08-04T05:46:25+5:30
पालिकेची परवानगी : सम-विषमचा नियम बदलला
मुंबई : ‘मिशन बिगिन अगेन’ अंतर्गत सम-विषम नियम बदलून मुंबईतील सर्व दुकने यापुढे सुरू ठेवण्याची परवानगी मुंबई महापालिका प्रशासनाने दिली आहे. याबाबतचे सुधारित परिपत्रक आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी सोमवारी जाहीर केले. यापूर्वी सम-विषम पद्धतीने दुकाने सुरू ठेवण्याचा नियम बदलत आता रस्त्याच्या दोन्ही बाजूंची दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच बुधवारपासून मॉल्स आणि व्यापारी संकुले सकाळी ९ ते सायंकाळी ७ या वेळेत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.
गेल्या महिनाभरापासून मुंबईतील कोरोनाचा प्रसार नियंत्रणात येत आहे. कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधीही ७६ दिवसांवर पोहोचला आहे, तर दैनंदिन रुग्णवाढ ही सरासरी ०.९० टक्के आहे. त्यामुळे मुंबईतील सर्व दुकाने सुरू ठेवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. त्याचबरोबर मॉल्स व व्यापारी संकुलांनाही आता ५ आॅगस्टपासून आपले शटर उघडता येणार आहे. पण मुंबईतील स्वीमिंग पूल अजूनही बंदच राहणार आहेत.
साडेतीन लाख दुकानदारांना दिलासा
च्फेडरेशन आॅफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष वीरने शाह यांनी म्हटले की, राज्य सरकारने दुकाने सुरू करताना दुकानासाठी सम-विषम नियम लागू होता. त्यामुळे महिनाभरात १२ दिवस दुकाने खुली राहत होती. त्यामध्ये मिळणाऱ्या उत्पन्नातून कामगारांचा खर्च, दुकानाचे भाडे देणेही कठीण होते. त्यामुळे दोन्ही बाजूची दुकाने सातही दिवस खुली राहावीत यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता.
च्आता सर्व दुकाने खुली ठेवता येणार असल्याने साडेतीन लाख दुकानदारांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान सोशल डिस्टन्सिंग पाळा, निर्जंतुकीकरण करा, अशा सूचना आम्ही सर्व दुकानदारांना दिल्याचे त्यांनी सांगितले.
मॉल्स, व्यापारी संकुलेही उघडणार शटर
मॉलमधील चित्रपटगृह, फूड कोर्ट आणि रेस्टॉरंट उघडण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. मात्र होम डिलिव्हरीची परवानगी येथील रेस्टॉरंट आणि फूड कोर्टला दिली आहे.
अन्यथा कडक कारवाई
दुकाने सुरू ठेवताना सोशल डिस्टन्सिंगचे नियम तसेच मास्कचा वापर, गर्दी टाळणे, सॅनिटायझरचा वापर बंधनकारक आहे. याचे उल्लंघन करणाºया दुकानदार आणि संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.