Join us

सर्व दुकानांनी नामफलक मराठीत लावणे अनिवार्य - प्रवीण परदेशी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2020 1:07 AM

प्रशासनासह सार्वजनिक सर्व ठिकाणी मराठीचा प्राधान्याने वापर झाला पाहिजे. सर्व दुकानांनी नामफलक मराठीत लावले पाहिजेत, असे मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी म्हणाले.

मुंबई : प्रशासनातील सर्व अधिकारी वर्गाने कामकाजामध्ये मराठीचाच वापर करावा, याकडे आपला कटाक्ष आहे. महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये मराठी भाषा शिकविणे अनिवार्य आहे. प्रशासनासह सार्वजनिक सर्व ठिकाणी मराठीचा प्राधान्याने वापर झाला पाहिजे. सर्व दुकानांनी नामफलक मराठीत लावले पाहिजेत, असे मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी म्हणाले.मुंबई महानगरपालिकेच्या वतीने गुरुवारी महानगरपालिका सभागृहात आयोजित ‘मराठी भाषा गौरव दिन व पंधरवडा २०२०’ शुभारंभप्रसंगी प्रवीण परदेशी बोलत होते. या वेळी कवी, सिनेअभिनेते किशोर कदम उर्फ सौमित्र, महापौर किशोरी पेडणेकर आदी उपस्थित होते.किशोर कदम म्हणाले, भाषा ही संस्कृतीचा आधार असते. त्यामुळे मातृभाषा मराठी भाषेचे जतन, संवर्धन करणे हे आपले कर्तव्यच आहे. लोकगीते, म्हणी, भारुडं, अभंग-ओव्या हे मराठी भाषेचे वैभव असून ते जपले पाहिजे. देवाने माणसाची निर्मिती गोष्टी सांगण्यासाठी केली आहे. भाषेच्या आधाराशिवाय माणूस, समाज, संस्कृती जगू शकत नाही. दहावीनंतर इंग्रजी भाषेचाही प्रचंड अभ्यास केला. इंग्रजीतील झाडून सारे प्रमुख साहित्य आपण वाचून काढले. असे असले तरी मराठी माध्यमातून शिकल्याचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याचे आज कळते. एकापेक्षा अधिक भाषांमध्ये पारंगत असणे, नवनवीन भाषा शिकणे यातही आनंद असतो. पण हे सर्व करताना इतर भाषांतील शब्द स्वीकारून त्यांचे मराठीकरण करणे, त्यातून आपली भाषा समृद्ध करण्यावर कटाक्ष असला पाहिजे. प्रत्येक प्रांतातील भाषेचे आपले एक भाषाशैली वैशिष्ट्य असते. प्रमाणित भाषेच्या आग्रहास्तव त्याला उणे लेखणे योग्य नाही, असे सांगतानाच आई नावाचे विद्यापीठ जे शिकवते ते जगातील कोणतेही विद्यापीठ शिकवत नाही, असे ते म्हणाले.मराठीने आपणा सर्वांना बोलायलाच नव्हेतर, जगायलाही शिकवले आहे. भाषेचे स्थान आपल्या जीवनात आईइतकेच पूजनीय आहे. महानगरपालिका प्रशासनाने मराठी भाषेच्या गौरवार्थ केलेला हा कार्यक्रम अविस्मरणीय आहे.- किशोरी पेडणेकर, महापौरमुंबईतील सर्व दुकानांचे नामफलक मराठीतच असायला हवेत, याची सक्तीने अंमलबजावणी करावी. मुंबईतील वाणिज्य दूतांच्या कार्यालयांमध्येही मराठी भाषेतसुद्धा फलक असावेत.- विशाखा राऊत, सभागृह नेत्या

टॅग्स :मुंबई महानगरपालिका