मुंबई - महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंत (दादा) पाटील यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आपल्या आमदारांसमवेत विधानभवनात आले होते. त्यावेळी फोटोग्राफर लोकांनी आमदारांसह ग्रुप फोटो काढायची विनंती केली. शरद पवारांनीही लगेच, फोटो काढण्यासाठी होकार दिला. मात्र, यावेळी तेथे घडलेल्या एका गोष्टीची चांगलीच चर्चा रंगली. पवारांच्या छोट्याश्या कृतीमुळे तेथील सर्वचजण पुन्हा एकदा पवारांचे फॅन झाले.
राज्यातील राजकीय वातावरण बदललं असून राष्ट्रपती राजवट लागली आहे. त्यामुळे सरकार स्थापनेच्या हालचाल गतीमान झाल्या आहेत. राज्यातील या नाट्यमय राजकीय घडामोडींचे सुत्रधार म्हणून शरद पवार यांच्याकडे पाहिले जाते. तर, दुसरे नाव शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे घेतले जाते. आज काही प्रमाणात या घडामोडी कमी झाल्या असून राज्यात महाशिवआघाडीचं सरकार स्थापन होईल, हे निश्चित झालं आहे. त्यामुळेच, शरद पवार यांनी आज विधानभवनात जाऊन वसंत दादा पाटील यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केलं. त्यावेळी, फोटोग्राफर लोकांनी आमदारांसह ग्रुप फोटो काढायची विनंती केली. शरद पवारांनीही लगेच, फोटो काढण्यासाठी होकार दिला.
पवारांनी फोटोला परवानगी दिल्यानंतर, फोटो काढताना अचानक त्यांचे लक्ष कोपऱ्यात उभा असणाऱ्या विधानभवनाच्या सुरक्षारक्षकाकडे गेले. त्यावेळी, खुद्द पवारांनी त्या सुरक्षारक्षकाला बोलवून घेतलं. विशेष म्हणजे पहिल्या रांगेत उभे करुन स्वतःसोबत फोटो काढला. पवारांच्या या लहान परुंतु भावनिक कृतीने अनेकांचे लक्ष वेधले. तर, त्या सुरक्षारक्षकालाही गहिवरुन आले. या फोटोनंतर पवारांच्या या कृतीचीच चर्चा सर्वत्र रंगली होती. सध्या सोशल मीडियावरही हा फोटो शेअर होत आहे.