१५ वर्षांनी पुन्हा 'ऑल द बेस्ट'; मयुरेश-मनमीत पेम बंधूंसह विकास पाटील मुख्य भूमिकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2024 04:59 PM2024-01-24T16:59:17+5:302024-01-24T16:59:58+5:30
पुन्हा हे नाटक रंगभूमीवर आणण्याबाबत देवेंद्र पेम म्हणाले की, या नाटकावर मराठी रसिकांनी अपार प्रेम केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई - आजवर बऱ्याच नवोदितांना यशाचा महामार्ग दाखवणारे तसेच मराठी रंगभूमीवरील माईल स्टोन ठरलेले 'ऑल द बेस्ट' हे नाटक १५ वर्षांनी पुन्हा रसिकांच्या भेटीला येणार आहे. या नाटकात मयुरेश आणि मनमीत या पेम बंधूंसोबत 'बिग बॅास' फेम विकास पाटील मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
मराठी चित्रपटसृष्टीला बरेच सुपरस्टार देणाऱ्या 'ऑल द बेस्ट' नाटकाचा जेव्हा उल्लेख होतो, तेव्हा भरत जाधव, अंकुश चौधरी, संजय नार्वेकर यांची सर्वप्रथम आठवण येते. याखेरीज श्रेयस तळपदे, सतीश राजवाडे, आनंद इंगळे, जितेंद्र जोशी, दीपा परब, सुहास परांजपे, राजेश देशपांडे, संतोष मयेकर यांसारख्या दिग्गज कलाकारांनी या नाटकातून करिअरची सुरुवात केली आहे. आता हे नाटक नव्या रूपात आणि नव्या संचात रसिकांच्या भेटीला येत आहे. या निमित्ताने मूकबधीर, कर्णबधीर, दृष्टीहिन मित्रांची धमाल कॉमेडी १५ वर्षांनी पुन्हा रंगभूमीवर अनुभवायला मिळणार आहे. देवेंद्र पेम लिखित-दिग्दर्शित 'ऑल द बेस्ट'च्या नवीन संचात मयुरेश पेम, मनमीत पेम आणि विकास पाटील तीन मित्रांच्या भूमिकेत दिसणार आहेत. यांच्या जोडीला अभिनेत्री रिचा अग्निहोत्री आहे. अनामय नाट्यसंस्थेची निर्मिती असणाऱ्या या नाटकाच्या शुभारंभाचा प्रयोग २ फेब्रुवारीला होणार आहे. सध्या या नाटकाची जोरदार तालीम सुरू आहे.
पुन्हा हे नाटक रंगभूमीवर आणण्याबाबत देवेंद्र पेम म्हणाले की, या नाटकावर मराठी रसिकांनी अपार प्रेम केले आहे. त्यांना हे नाटक पुन्हा पाहायला नक्कीच आवडेल. गेल्या १५-२० वर्षांतील नवीन पिढीला 'ऑल द बेस्ट' नाटकाचे नाव माहीत आहे. त्यांना हे विश्वविक्रमी नाटक पाहता यावे यासाठी हे नाटक घेऊन येत असल्याचेही पेम म्हणाले.
देवेंद्र पेम लिखित-दिग्दर्शित 'ऑल द बेस्ट' ही एकांकिका ९०च्या दशकाच्या सुरुवातीला विशेष गाजली होती. ३१ डिसेंबर १९९३ रोजी या व्यावसायिक नाटकाचा पहिला प्रयोग सादर झाला. ३० वर्षांपूर्वी रंगभूमीवर आलेल्या या नाटकाने बरेच विक्रम करत रंगभूमीवर इतिहास घडवला. हे धमाल नाटक रसिकांनी असे काही उचलून धरले की, त्या काळी एकाच वेळी तीन टिम 'ऑल द बेस्ट'चे वेगवेगळे प्रयोग सादर करायचे. दर महिन्याला ६०-७० प्रयोग व्हायचे. अशा प्रकारे या नाटकाने पहिल्या पाच वर्षांत तब्बल २१०० प्रयोग केले.