Join us

मुंबईतील सर्व महाविद्यालये हाउसफुल्ल, बाकीच्यांच्या प्रवेशाचे काय ?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2022 5:52 AM

प्रवेश क्षमतेत २० टक्के वाढीव जागा द्या; युवासेना सिनेट सदस्यांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबई विद्यापीठांतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांनी पदवी प्रवेश प्रक्रिया येत्या ८ ऑगस्टपर्यंत पूर्ण करून येत्या १० ऑगस्टपासून पदवीचे नियमित वर्ग सुरू करावेत अशी सूचना सर्व महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांना नुकतीच दिली आहे. मात्र मुंबई विद्यापीठांतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांच्या ३ गुणवत्ता याद्या केंद्रीय मंडळाचे निकाल लागण्याआधीच जाहीर झाल्याने व तेथील जागा फुल्ल झाल्या. 

आता ज्यांना प्रवेश मिळालेले नाहीत त्यांनी करायचे काय, त्यांना चांगले महाविद्यालय मिळेल का? या चिंतेने अनेक पालक, विद्यार्थ्यांना ग्रासले आहे.  त्यामुळे सरसकट सर्वच महाविद्यालयांमध्ये  १० ते २० टक्के वाढीव जागा उपलब्ध करून द्याव्यात जेणेकरून केंद्रीय मंडळाच्या विद्यार्थ्यांवर अन्याय न होता त्यांनाही त्यांच्या गुणवत्तेनुसार प्रवेश मिळू शकेल अशी मागणी युवासेना सिनेट सदस्यांकडून करण्यात आली आहे. यूजीसीच्या सूचनांप्रमाणे केंद्रीय मंडळाच्या निकालानंतर मुंबई विद्यापीठाकडून पदवी प्रवेशाची अंतिम तारीख जाहीर करण्यात आली असून येत्या १० ऑगस्टपासून कला, वाणिज्य आणि विज्ञान अभ्यासक्रमांचे नियमित वर्ग सुरू करावेत अशा सूचना मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाकडून मुंबई विभागातील सर्व संलग्न महाविद्यालयांना दिल्या आहेत. पदवी प्रवेशाच्या नियमित वर्गांना लेटमार्क लागल्यास पुढील शैक्षणिक वर्ष कोलमडण्याची शक्यता असल्याने मुंबई विद्यापीठाकडून वेळेत वर्ग सुरू करण्यासाठी या सूचना दिल्या असल्याचे स्पष्ट करण्यात येत आहे.

सीबीएसई, आयसीएसई सारख्या केंद्रीय मंडळाचे अनेक विद्यार्थी अजूनही प्रवेशाविना आहेत. त्यांचे निकाल यंदा उशिरा लागल्यामुळे अनेक नामांकित महाविद्यालयांमध्ये प्रवेशाची संधी हुकल्याने पालक व विद्यार्थी नाराज आहेत. दरम्यान कोणत्या महाविद्यालयांत जागा उपलब्ध आहेत? किती आहेत त्याची चौकशी विद्यार्थ्यांना वैयक्तिक पातळीवर करून त्याप्रमाणे महाविद्यालयांचा अर्ज भरावा लागत असून त्यांची तारांबळ उडत आहे. विद्यापीठाने महाविद्यालयांना अतिरिक्त जागांसाठी अर्ज करण्याचे आवाहन केले असले तरी विद्यार्थ्यांचे प्रवेश गुणवत्तेनुसार होतील का? सगळ्यांनाच जागा उपलब्ध होइल का असे अनेक प्रश्न अनुत्तरित राहत आहेत. या सगळ्यावर उपाय म्हणून मुंबई विद्यापीठाने सरसकट सर्व महाविद्यालयांच्या प्रवेश क्षमतेत वाढ करावीच अशी मागणी युवासेना सिनेट सदस्यांकडून करण्यात आली आहे.

    आताही आवश्यकता असल्यास महाविद्यालयांना जागा उपलब्ध होणार आहेत; मात्र काही महाविद्यालयातील जागा अशोक फुल्ल झाल्याने अनेक ठिकाणी गुणवत्ता असूनही विद्यार्थ्यांना अर्ज करता येत नाहीये असे असे दिसून आले आहे.  या कारणास्तव हा अन्याय दूर होण्यासाठी सर्वसाधारण अभ्यासक्रमाकरिता १० टक्के तर व्यावसायिक अभ्यासक्रमाकरिता २० टक्के अशी सरसकट जागांची वाढ यंदा सर्व संलग्नित महाविद्यालयांना द्यावी.

मुंबई विद्यापीठ प्रशासनाकडून संलग्नित महाविद्यालयांना जागांच्या नैसर्गिक वाढीच्या नियमांप्रमाणे आवश्यकता असल्यास १० टक्के प्रमाणे अतिरिक्त जागा उपलब्ध होत असतात.

या सर्व महाविद्यालयांना सक्तीची प्रवेश प्रक्रिया राबवून गुणवत्तेनुसारच विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावेत अशी मागणी युवासेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत आणि राजन कोळंबेकर यांचे शिष्टमंडळाने कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांना भेट देऊन केली आहे.

अतिरिक्त फेरी राबविण्याची मागणी

मुंबई : पदवी प्रवेशाच्या तीनही गुणवत्ता याद्या जाहीर झाल्यानंतर आयसीएसई व सीबीएसई केंद्रीय मंडळाचे निकाल जाहीर झाले आहेत. त्यामुळे अनेक गुणवंत विद्यार्थी मुख्य प्रवेश प्रक्रियेपासून वंचित राहिले आहेत. हा केंद्रीय मंडळाच्या विद्यार्थ्यांवर अन्याय असून, विद्यापीठाने सर्व महाविद्यालयांना अधिक जागांची प्रवेश क्षमता उपलब्ध करून या विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त फेरी राबवावी, अशी मागणी आता  केंद्रीय मंडळाच्या विद्यार्थी, पालकांकडून होत आहे. 

सर्व विद्यार्थ्यांचे पदवी प्रवेश झाल्यानंतरच विद्यापीठ प्रशासनाने नियमित वर्ग सुरू करण्याचाच विचार करावा, असेही­ मत विद्यार्थी आणि पालकांनी  व्यक्त केले आहे.

 

टॅग्स :मुंबईमहाविद्यालयदहावीचा निकाल