मुंबई – राज्यात भोंग्यांवरून राजकारण पेटलं असताना आता राज्य सरकारनं हालचाली सुरू केल्या आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ३ मे पर्यंत मशिदीवरील भोंगे हटवावे अशी मागणी केली होती. जर हे भोंगे हटले नाहीत तर मशिदीसमोर लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा लावू असा इशारा राज ठाकरेंनी दिला होता. राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर राज्यात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ शकते हे लक्षात घेता गृह विभागाच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडत आहे. त्यात सर्व धार्मिक स्थळावरील लाऊडस्पीकरबाबत मार्गदर्शक सूचना जारी करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आले आहे.
राज्य सरकारच्या या निर्णयावर भाजपा नेते मोहित कंबोज(Mohit Kamboj) यांनी भाष्य करत म्हटलंय की, महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आज मंदिर असो किंवा मशीद असो लाऊडस्पीकर वाजवायचे असल्यास परवानगी घेऊन वाजवावी त्यांच्या या निर्णयाचे मी स्वागत करतो. येत्या काळात मशिदीवर लाऊड स्पीकर लावण्यासाठी जी नियमावली तुम्ही ठरवणार आहात तीच नियमावली मंदिराच्या लाऊडस्पीकर बाबत ठरवावी अशी विनंती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना केली आहे.
तसेच ८० टक्के लाऊडस्पीकर हे मदरशांवर लावलेले आहेत २० टक्के लाऊड स्पीकर हे मशिदीवर आहेत. त्यामुळे मदरशांवरील लाऊडस्पीकर हे काढून टाकले पाहिजेत आणि जी मशिद अनधिकृत आहेत त्या मशिदीला लाऊडस्पीकरची परवानगी दिली जाऊ नये. सर्व लोकांनी एकत्रित येऊन ही सामाजिक चळवळ सुरु केलेली आहे. सुप्रीम कोर्टाचे जे काही नियम आहेत ते नियम सरकारने योग्य रितीने राबवावे आणि मशिदीवरील अनधिकृत भोंगे हे उतरवावे आणि याची सुरुवात मुंबईतून होईल. मुंबईमधून सर्व देशाला दिशा मिळेल असंही मोहित कंबोज यांनी सांगितले आहे.
काय म्हणाले होते राज ठाकरे?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे(MNS Raj Thackeray) यांनी गुढी पाडवा मेळाव्यात मशिदीवरील भोंगे हटवावे अशी मागणी केली होती. त्यानंतर उत्तरसभेत यावर स्पष्टीकरण देताना सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन केले जावे असं सांगत ३ मे पर्यंत भोंगे हटले नाही तर मशिदीसमोर हनुमान चालीसा लावू असा इशारा दिला होता. पुण्यातील पत्रकार परिषदेत राज ठाकरेंनी त्याचा पुनरुच्चार केला. राज ठाकरे म्हणाले की, "देशभरातल्या नागरिकांना माझं एवढंच सांगणं आहे की, भोंग्याचा विषय धार्मिक नाही, सामाजिक आहे. भोंग्यामुळे फक्त हिंदुना नाही, तर मुस्लिमांनाही त्रास होतोय, त्यामुळे ३ तारखेपर्यंत आम्ही शांत बसू आणि नंतर जशास तसं उत्तर देऊ. त्यामुळे आता राज्य सरकारच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.