नालासोपारा (मंगेश कराळे) :- राहण्यासाठी दिलेल्या रूममध्ये सामान ठेवण्याच्या किरकोळ कारणातून गुरुवारी संध्याकाळी तीन आरोपींनी एका २५ वर्षीय तरुणाला शिवीगाळ, ठोशाबुक्यांनी मारहाण करून चाकू तरुणाच्या पोटात दोन वेळा बोकसून हत्या केली होती. याप्रकरणी तिन्ही आरोपींना वालीवच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी सुरत येथून अटक केली आहे. या गुन्ह्याचा २४ तासांत उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. वालीव पोलीस पुढील गुन्ह्याचा तपास करत आहे.
बिल्ड फॅब स्ट्रक्चर सिस्टम कंपनीने कामणच्या शिलोत्तर येथील रॉयल इंडस्ट्रीयल हब याठिकाणी वेअर हाऊस (गोडाऊन) बांधण्यासाठी कंत्राट घेतले होते. कंत्राटदार इंद्रजित सरकार (५०) यांनी सदर साईटवर कंपनीचे मजूर राहण्यासाठी शिलोत्तर सर्व्हे नंबर १६३, १६४ या जागेत दिलशान सिद्धिकी यांच्या मालकीच्या दोन रूममध्ये राहण्याची व्यवस्था केली होती. गुरुवारी संध्याकाळी साडे सहाच्या सुमारास त्यांचा पुतण्या जयंतो मंडल (२५) व साहिल सिद्धीकी यांच्यात रूममध्ये सामान ठेवण्याच्या किरकोळ कारणावरून भांडण झाले होते. आरोपी मेहफुज सिद्धीकी (५०), त्यांचा मुलगा साहिल (२५) आणि त्याचा मित्र राजाबाबू सिंह (३२) यातिघांनी जयंतो याला शिवीगाळ करून ठोशाबुक्यांनी मारहाण केली होती. आरोपी साहिलने सोबत आणलेल्या बॅगेतील चाकू काढून जयंतो यांच्या डाव्या बरगडीवर दोन वेळा बोकसून त्याची हत्या केली होती. आरोपी हे त्यांचे मोबाईल फोन बंद करून घटनास्थळावरून पळून गेले होते.
सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी केलेल्या मार्गदशनाप्रमाणे वालीव गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी आणि अंमलदार यांनी तांत्रिक विश्लेषण व मिळालेल्या माहितीच्यानुसार आरोपींच्या शोधासाठी वेगवेगळे पथके तयार केले होते. त्यातील एक पथक गुजरात राज्यातील सुरत येथे पाठवून तिन्ही आरोपींना त्यांच्या गावी बिहार येथे पळून जाण्याच्या तयारीत असताना शनिवारी ताब्यात घेऊन अटक केले आहे.
१) याप्रकरणी तिन्ही आरोपींना सुरत येथून शनिवारी ताब्यात घेऊन अटक केले आहे. रविवारी तिन्ही आरोपींना वसई न्यायालयात हजर केल्यावर पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. - कैलास बर्व्हे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वालीव पोलीस ठाणे)