Join us

तीनही याचिका फेटाळल्या; शरद पवार गटाला खडसावताना राहुल नार्वेकर काय म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2024 4:51 PM

शरद पवार गटाकडून अजित पवार गटाविरोधात दाखल करण्यात आलेल्या तिन्ही याचिका नार्वेकर यांनी फेटाळून लावल्या आहेत. 

NCP MLA Disqualification Case Rahul Narvekar ( Marathi News ) :  विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेप्रकरणी आज आपला निर्णय जाहीर केला आहे. निवडणूक आयोगानंतर राहुल नार्वेकर यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा मूळ पक्ष अजित पवार यांचाच असल्याचं स्पष्ट केलं आहे. आमदार अपात्रतेबाबत शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादीचाही निकाल आला असून दोन्ही गटाचे आमदार पात्र ठरवण्यात आले आहेत. यावेळी अजित पवार गटाच्या आमदारांना अपात्र करण्याबाबत शरद पवार गटाकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरून विधानसभा अध्यक्षांनी खडेबोलही सुनावले आहेत.

"पक्षातील मतभेद म्हणजे कायद्याचा भंग नव्हे. पक्षांतर्गत नाराजी म्हणजे विधीमंडळ पक्षाची नाराजी नाही. शरद पवार गटाने १०व्या अनुसूचीचा गैरवापर करू नये. तसंच आमदारांचा आवाज दाबण्याचाही प्रयत्न करू नये," अशा शब्दांत राहुल नार्वेकर यांनी शरद पवार गटाला फटकारलं आहे. तसंच शरद पवार गटाकडून अजित पवार गटाविरोधात दाखल करण्यात आलेल्या तिन्ही याचिका नार्वेकर यांनी फेटाळल्या आहेत. 

राष्ट्रवादी पक्षाची घटना व नेतृत्वरचनेतून पक्ष कोणाचा याचा निकाल घेणे अशक्य असल्याने विधीमंडळातील बहुमत या निकषावर अजित पवार यांचा गट हाच अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटलं आहे. निवडणूक आयोगापाठोपाठ विधानसभा अध्यक्षांनीही पक्ष अजित पवारांचाच असल्याचं सांगितल्याने शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे.

दरम्यान, जुलै २०२३ मध्ये अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचा एक गट राज्यातील युती सरकारमध्ये सामील झाला होता. त्यानंतर राष्ट्रवादीत अजित पवार गट आणि शरद पवार गट एकमेकांसमोर आले. दोन्ही गटांकडून एकमेकांविरोधात आमदार अपात्रता याचिका दाखल केल्या होत्या. या याचिकांवर नार्वेकरांसमोर सुनावणी झाली. साक्ष नोंदणी, उलटतपासणी आणि अंतिम युक्तिवादानंतर ३१ जानेवारी रोजी सुनावणीचे कामकाज संपले आणि अखेर आज याबाबत विधानसभा अध्यक्षांनी आपला निकाल वाचून दाखवला आहे. 

टॅग्स :राष्ट्रवादी काँग्रेसराहुल नार्वेकरशरद पवारअजित पवार