मुंबई - मुंबईसह आसपासच्या शहरांमधील वीज पुरवठा खंडित झाला आहे. ग्रीड फेल झाल्यानं बत्ती गुल झाल्याची माहिती मिळत आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवलीतील वीज पुरवठा खंडित झाल्यानं ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. आज अनेक विद्यार्थ्यांची ऑनलाईन परीक्षा आहे. मात्र वीज पुरवठा खंडित असल्याने पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. याच दरम्यान केसी महाविद्यालयाने परीक्षा पुढे ढकलल्या असल्याची माहिती मिळत आहे.
केसी महाविद्यालयाने सर्व यूजी आणि पीजी परीक्षा या रविवारी (18 ऑक्टोबर) रिशेड्यूल केल्याची माहिती दिली आहे. इतर महाविद्यालयांच्या बाबतीतही असाच निर्णय घेण्याची मागणी विद्यार्थी आणि विद्यार्थी संघटनांकडून होत आहे. मुंबईतील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित झाल्याने अंतिम वर्षाच्या आजच्या परीक्षा रद्द करून त्यांचे पुनर्नियोजन करण्याची मागणी महाराष्ट्र स्टुडन्ट्स वेल्फेअर असोसिएशनकडून करण्यात आली आहे.
महाविद्यालयीन स्तरावरच्या परीक्षांना याचा फटका बसणार
विद्यापीठ विभागाच्या व आयडॉल परीक्षा 18 ऑक्टोबरपर्यंत नाहीत, मात्र महाविद्यालयीन स्तरावरच्या परीक्षांना याचा फटका बसणार आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षा यंदा क्लस्टर पद्धतीने होत असल्याने लीड महाविद्यालय आणि त्यातील इतर महाविद्यालये ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेत आहेत. परीक्षा ऑनलाईन पद्धतीने असल्यामुळे विशेषतः 11 ते 12 आणि पुढील सत्रातील परीक्षा रद्द केला जाण्याची चर्चा आहे.
ग्रीड फेल झाल्यानं MMR मधील अनेक भागांत वीज पुरवठा खंडित; परीक्षांमुळे विद्यार्थी-पालक काळजीत
मुंबई आणि आसपासच्या शहरांमध्ये महावितरण, अदानी, बेस्टच्या माध्यमातून वीजपुरवठा करण्यात येतो. या सगळ्याच शहरांमधील वीजपुरवठा एकाच वेळी खंडित झाल्यानं नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय. विशेषतः विद्यार्थ्यांना याचा सर्वाधिक फटका बसू शकतो. याशिवाय अनेक लोकलदेखील थांबल्या आहेत. महापारेषणच्या कळवा-पडघा जीआयएस केंद्रात सर्किट १ ची देखभाल-दुरुस्ती सुरू होती. यावेळी सर्व भार सर्किट-2 वर होता. मात्र, सर्किट 2 मध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्यानं मुंबई आणि ठाण्यातील बहुतांश भागात वीज पुरवठा खंडित झाला आहे. तो पूर्ववत करण्याचं काम सुरू आहे. विद्यार्थ्यांसोबतच अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाही या पॉवर कटचा फटका बसला. कारण या बिघाडामुळे लोकल सेवाही ठप्प झाली आहे.