राज्यात लवकरच ‘ऑल वूमन टूरिझम’; प्रत्येक जिल्ह्यात १५ जणांची पर्यटन समिती- मंगलप्रभात लोढा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2022 08:03 AM2022-10-30T08:03:50+5:302022-10-30T08:16:34+5:30
राज्यातील महत्त्वाच्या १२ पर्यटनस्थळांवर पर्यटन मेळ्यांचे आयोजन केले जाईल.
मुंबई : राज्यातील पर्यटन सुविधांचा मेकओव्हर केला जाणार असून आहे.. ‘सबकूछ महिला’ असे स्वरूप असलेले महिला पर्यटन लवकरच सुरू करण्याची योजना असल्याचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी शनिवारी ‘लोकमत’ला सांगितले.
पर्यटनस्थळांच्या ठिकाणी केवळ महिलांच्या सहलींचे आयोजन, त्यांच्या गाड्यांच्या चालक, वाहकही महिला, त्यांच्यासाठी गाइडदेखील महिला, त्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी महिला पोलिसांची सुरक्षा अशा ‘ऑल वूमेन टूरिझम’ची लोढा यांची संकल्पना आहे. देशात केवळ महिलांसाठी सहलींचे आयोजन करणाऱ्या संस्था, कंपन्यांचा सल्लादेखील त्यासाठी घेण्यात येणार आहे.
प्रत्येक जिल्ह्यात पर्यटन क्षेत्रातील मान्यवरांची १५ जणांची समिती नियुक्त केली जाईल व त्यांच्या शिफारशींनुसार विकास केला जाईल. राज्यातील १६ प्रमुख ट्रेकिंग स्थानांवर स्वच्छतागृहे व इतर सुविधा निर्माण केल्या जातील. डेक्कन ओडिसी ट्रेन आणि मुंबईतील रो- रो बससेवा पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.
राज्यातील महत्त्वाच्या १२ पर्यटनस्थळांवर पर्यटन मेळ्यांचे आयोजन केले जाईल. त्यात स्थानिक लोककला, हस्तकला उत्पादने यांना प्रोत्साहन दिले जाईल. सांस्कृतिक कार्यक्रमही होतील. दरवर्षी एक लाख महिलांना रोजगार उपलब्ध करून देणारे नवे धोरण जाहीर करण्यात येईल, प्रमुख गड- किल्ल्यांवर पर्यटन सुविधा निर्माण करण्यात येतील, असेही लोढा यांनी सांगितले.