Join us

शब्दावाचून कळले सारे..

By admin | Published: November 12, 2014 1:16 AM

नाटक म्हटले की संवाद असणो महत्त्वाचे आहे. म्हणजे संवाद हीच नाटकाची जान आहे.

मुंबई : नाटक म्हटले की संवाद असणो महत्त्वाचे आहे. म्हणजे संवाद हीच नाटकाची जान आहे. मात्र संवादाशिवाय नाटक होऊच शकत नाही, या उक्तीला सडेतोड उत्तर देत ‘शब्दावाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले’ अशी श्रोत्यांची अवस्था करत नाटय़शाळा संस्थेच्या ‘भरारी’ नाटकाने उपस्थितांची मने जिंकली. पुल युवा महोत्सवात मंगळवारी कर्णबधिर मुलांनी हा नाटय़ाविष्कार सादर करीत प्रेक्षकांची वाहवा मिळवली.
मानवी जीवनाची उत्क्रांती कशी झाली, याची मांडणी वेगळ्या धाटणीने या नाटकात करण्यात आली आहे. शिवाय, या नाटकातील मुद्राभिनय आणि प्रत्येक हालचाली वैशिष्टय़पूर्ण आहेत. आकाशगंगा, पृथ्वी, सूर्य, चंद्र यांच्या निर्मितीपासून ते मानवी संस्कृती इथपयर्ंतचा प्रवास उलगडणारे हे नाटक म्हणजे संगीत, प्रकाशयोजना, वेशभूषा आणि मुकाभिनयाचा जबरदस्त प्रभाव पाडणारी कलाकृती ठरले. तसेच नाटकातील संगीत आणि अभिनय याचीही उत्तम सांगड घालण्यात आली असल्याचे दिसून आले.
पुल महोत्सवाच्या चौथ्या दिवशी ‘आम्ही जातो आमुच्या गावा’ हा चित्रपट दाखवला गेला. त्याला नव्या - जुन्या पिढीतल्या प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.  त्यानंतर शास्त्रीय गायक प्रशांत कळुंद्रेकर यांची ‘त्रिवेणी - अ ट्रिब्युट टू लिजेंडस’ या मैफिलीला दर्दी संगीत रसिकांनी विशेष दाद दिली. या मैफिलीत पं.वसंतराव देशपांडे, पं.कुमार गंधर्व आणि जितेंद्र अभिषेकी यांना सांगीतिक मानवंदना दिली गेली. शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त कल्पेश जाधव यांनी सादर केलेली मल्लखांबाची प्रात्यक्षिके उपस्थितांना अचंबित करून गेली.
सायंकाळी शाहिरांच्या पहाडी आवाजाने अकादमीचा परिसर दुमदुमून गेला. या भागातल्या अनेक ज्येष्ठ नागरिकांच्या  मनात सामाजिक - राजकीय चळवळींच्या स्मृतींना उजाळा मिळाला. राज्यभरातून प्रख्यात शाहीर मधू खामकर, शांताराम चव्हाण, भिकाजी भोसले, दत्ता ठुले, 
कृष्णकांत जाधव, नीलेश जाधव आणि दादा मांजरेकर यांच्या पहाडी आवाजात हा शाहिरी जलसा रंगला. शाहिरी परंपरेतले हे दिग्गज एकत्र ऐकण्याचा हा दुर्मीळ योग होता. (प्रतिनिधी)
 
गेली अनेक वर्षे ‘नाटय़शाळा’ अपंग मुलांसाठी कार्यरत आहे. त्यामुळे अशा महोत्सवातून या मुलांना व्यासपीठ मिळते आहे, याचा आनंदच आहे. मात्र प्रेक्षकांनीही या मुलांना सहानुभूती न दाखवता कलाकार म्हणून पाहावे, तर त्यांना न्याय मिळेल, असे ‘भरारी’ च्या निर्मात्या कांचन सोनटक्के यांनी सांगितले.