हुज्जत, झटापट अन् मारहाण केल्याचा आरोप; ‘पूछता है भारत’चा वाहनातूनही दिला नारा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2020 01:21 AM2020-11-05T01:21:16+5:302020-11-05T07:06:35+5:30

Arnab Goswami : सकाळी पाच वाजता मुंबई गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाचे प्रभारी सचिन वाझे यांच्या नेतृत्वात मुंबई पोलिसांचे पथक आणि रायगड पोलीस गोस्वामी यांच्या वरळी येथील घरी धडकले.

Allegation of assault, assault; Arnab Goswami gave slogan as ‘Poochta hai bharat’on vehicles | हुज्जत, झटापट अन् मारहाण केल्याचा आरोप; ‘पूछता है भारत’चा वाहनातूनही दिला नारा

हुज्जत, झटापट अन् मारहाण केल्याचा आरोप; ‘पूछता है भारत’चा वाहनातूनही दिला नारा

Next

मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेने बुधवार सकाळपासून गोंधळाचे वातावरण निर्माण केले. पाेलिसांशी दीड तास हुज्जत घातल्यानंतर गोस्वामी यांना पोलीस व्हॅनमध्ये बसवून अलिबागला नेण्यात आले. या वेळी सरकार आणि पोलिसांवर टीका करत वाहनातूनही ‘पूछता है भारत’चा त्यांचा नारा सुरू होता.
सकाळी पाच वाजता मुंबई गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाचे प्रभारी सचिन वाझे यांच्या नेतृत्वात मुंबई पोलिसांचे पथक आणि रायगड पोलीस गोस्वामी यांच्या वरळी येथील घरी धडकले. सुरुवातीला बराच वेळ पोलिसांना दारातच ताटकळत ठेवण्यात आले. वकिलांशी बोलल्यानंतर गोस्वामी यांनी पथकाला आत येऊ दिले. पुढे पोलिसांनी रीतसर सर्व कागदपत्रे, यापूर्वी दिलेल्या नोटीस त्यांना दाखवून सोबत येण्यास सांगितले. मात्र गोस्वामी यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांचे व्हिडीओ शूटिंग सुरू केले. या वेळी जवळपास दीड तास पाेलिसांशी हुज्जत घातल्यानंतर पोलिसांनी त्यांना हात धरून बाहेर नेण्यास सुरुवात करताच, गोस्वामी यांनी तब्येत बरी नसल्याचे सांगितले. त्यातही टीव्हीवर लाइव्ह अपडेट करण्यासाठी त्यांची धडपड सुरू होती. अखेर पोलिसांनी बळाचा वापर करीत त्यांना घरातून बाहेर काढत पोलीस वाहनात बसविले. वाहनातूनही सरकार आणि पोलिसांवर त्यांचे टीका करणे सुरू होते.
आठच्या एन.एम. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात डायरी नोंद करत त्यांना अलिबागला नेण्यात आले.

अर्णब गोस्वामी यांच्यासह पाच जणांविरुद्ध गुन्हा
बुधवारी अटके दरम्यान पोलिसांना धक्काबुकी, शिविगाळ करत सरकारी कागदपत्रे फाडून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी अर्णब गोस्वामी यांच्यासह ५ जणांविरुद्ध एन एम जोशी मार्ग पोलीस ठाण्यात  सार्वजनिक मालमत्ता कायद्याच्या अधिनियम प्रतिबंधक भादवि कलम ३५३, ५०४, ५०६,  ३४ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. रायगड पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली आहे. यात, गोस्वामी यांची पत्नी आणि मुलासह अन्य दोन व्यक्तीचा समावेश आहे. याप्रकरणी एन एम जोशी मार्ग पोलीस अधिक तपास करत आहेत. 

भाजपचे नेते आक्रमक
अर्णब गोस्वामी यांच्याविरुद्धची कारवाई सूडबुद्धीने होत असल्याचा आरोप भाजपने केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री एस. जयशंकर, रवी शंकर प्रसाद, प्रकाश जावडेकर, स्मृती इराणी इत्यादींनीही कारवाईचा निषेध केला.

काँग्रेसचे प्रत्युत्तर
अर्णब यांच्या अटकेवरून भाजपचा आक्रोश एकतर्फी असल्याचे प्रत्युत्तर काँग्रेसने दिले. अर्णब यांनी पत्रकारितेला बदनाम केले आणि भाजपने अशी एकतर्फी भूमिका घेतल्याने आपल्याला धक्का बसल्याची प्रतिक्रिया काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनाते यांनी दिली.

अटकेनंतर केली दीड तास चौकशी
अलिबाग : येथील अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अटक केल्यानंतर पत्रकार आणि रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अलिबाग येथील मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालय परिसरात मोठी गर्दी झाली होती.
इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्येनंतर बुधवारी, ४ नोव्हेंबरला रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने पत्रकार अर्णब गोस्वामींना अटक केली. मुंबईतील राहत्या घरातून त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर, त्यांना चौकशीसाठी अलिबागला आणण्यात आले. सकाळी साडेअकराच्या सुमारास पोलीस अलिबागमध्ये पोहोचले. पोलीस ठाण्यासमोर पोलीस गाडीतून उतरल्यानंतर अर्णब गोस्वामी यांनी पत्रकारांकडे बघून विजयाची खूण दाखवली.

घटनाक्रम : अटक प्रकरण
- सकाळी ७ वाजता : मुंबई आणि रायगड पोलीस अर्णब यांच्या वरळी येथील घरी धडकले.
- सकाळी ८:१५  वाजता : अर्णब गोस्वामी मुंबई आणि रायगड पोलिसांनी ताब्यात घेतले.
- सकाळी  ११.३० : पोलीस बंदोबस्तामध्ये अर्णब यांना अलिबाग पोलीस ठाण्यात नेण्यात आले.
- दुपारी १२.१४ : अलिबाग पोलीस ठाण्यातच आरोग्य तपासणी करण्यात आली.
- दुपारी १ : अर्णब न्यायालयात हजर, मारहाण केल्याचा आरोप.
- सायंकाळी ५ : पुन्हा आरोग्य चाचणी करत न्यायालयात हजर करण्यात आले.


आणीबाणी १९७७ मध्ये संपुष्टात आली, पण मानसिकता कायम - देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेता
आणीबाणीचे समर्थन करणारी शिवसेना आणि काँग्रेस एकत्र आल्यावर त्याच मानसिकतेचे प्रदर्शन करीत आहेत. सरकारविरोधी प्रत्येक आवाज दडपण्याचा प्रयत्न हा लोकशाहीसाठी घातक आहे. अशा प्रत्येक दडपशाहीविरुद्ध संघर्ष करणे हाच भारताचा नारा आहे. सांप्रदायिक हिंसा भडकविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना साथ देणाऱ्या काँग्रेसच्या प्रत्येक षडयंत्राचा अर्णब गोस्वामी यांनी भांडाफोड केला. त्याचीच किंमत त्यांना चुकवावी लागत आहे. 
 तुकडे - तुकडे गँग आणि पालघर येथे साधूंची हत्या करणाऱ्यांना कोणी शरण दिले याचे उत्तर देश सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याकडे मागत आहे. काँग्रेसच्या इशाऱ्यावर नाचणारे कमकुवत राज्य सरकार महाराष्ट्राला आणीबाणीच्या दिशेने नेत आहे. माध्यमांचे स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी गळे काढणारे आज कुठे लपून बसले आहेत. या सर्वांचे वर्तन आज उघडे पडले.

अटकेच्या कारवाईचा एनबीएकडून निषेध
- रिपब्लिक टीव्हीचे अर्णब गोस्वामी यांना अटक झाल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात रणकंदन सुरु झाले आहे. ज्या पद्धतीने अटक करण्यात आली, त्याचा न्युज ब्रॉडकास्टर्स असोसिएशनने निषेध केला. तसेच एडिटर्स गिल्डनेही अर्णब यांना झालेली अटक वेदनादायी असल्याची भावना व्यक्त केली. कारवाई सूडबुद्धीने झाल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी केला. 
- व्यावसायिक अन्वय नाईक आणि त्यांच्या आई कुमुद यांनी केलेल्या आत्महत्येप्रकरणी अर्णब यांना अटक करण्यात आली. पोलिसांनी अर्णब यांना ओढत घरातून नेले. याबाबत एडिटर्स गिल्डने निषेध व्यक्त केला. माध्यमांविरुद्ध सत्तेचा गैरवापर होऊ नये अशी अपेक्षा गिल्डने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे व्यक्त केली सूडबुद्धीने केलेली कारवाई योग्य नाही, अशी प्रतिक्रिया एनबीएने दिली. 

Web Title: Allegation of assault, assault; Arnab Goswami gave slogan as ‘Poochta hai bharat’on vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.