ऋतुजा लटकेंवर लाचखोरीचा आरोप, प्रकरण प्रलंबित, पालिकेच्या वकिलांचा धक्कादायक आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2022 03:15 PM2022-10-13T15:15:59+5:302022-10-13T15:17:08+5:30
Rituja Latke News: मुंबई महानगरपालिकेच्या वकिलांनी ऋतुजा लकटेंबाबत कोर्टामध्ये धक्कादायक दावा केला आहे. एका प्रकरणात ऋतुजा लटकेंवर लाच मागितल्याचा आरोप आहे, तसेच त्या प्रकरणाची तक्रार प्रलंबित असल्याचा दावा मुंबई महानगरपालिकेच्या वकिलांनी केला आहे.
मुंबई - अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने उमेदवारी जाहीर केलेल्या ऋतुजा लटके यांच्या पालिकेतील राजीनाम्यावरून सुरू झालेला वाद कोर्टात पोहोचला आहे. आज मुंबई हायकोर्टात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. त्यादरम्यान, मुंबई महानगरपालिकेच्या वकिलांनी ऋतुजा लकटेंबाबत कोर्टामध्ये धक्कादायक दावा केला आहे. एका प्रकरणात ऋतुजा लटकेंवर लाच मागितल्याचा आरोप आहे, तसेच त्या प्रकरणाची तक्रार प्रलंबित असल्याचा दावा मुंबई महानगरपालिकेच्या वकिलांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे.
मुंबई महानगरपालिकेने नोकरीचा राजीनामा स्वीकारला नसल्याने ऋतुजा लटके यांनी कोर्टात धाव घेतली होती. त्याबाबतची सुनावणी सध्या मुंबई हायकोर्टात सुरू आहे. या सुनावणीवेळी मुंबई महानगरपालिकेच्या वकिलांनी ऋतुजा लटकेंबाबत सनसनाटी दावा केला. ऋतुजा लटके यांच्याीविरोधात लाच मागितल्याचं प्रकरण प्रलंबित आहे, असा दावा पालिकेच्या वकिलांनी केला आहे. या प्रकरणी १२ ऑक्टोबर रोजी तक्रार दाखल झाली आहे. मात्र हे प्रकरण कधींचं आहे त्याचा तपशील देण्यात आलेला नाही.
दरम्यान, ऋतुजा लटके ह्या निवडणूक लढवू शकतात. अर्ज भरायचा असेल, तर खुशाल भरा, असे मुंबई महानगरपालिकेकडून सांगण्यात आले. त्यावर राजीनामा स्वीकारला जात नाही तोपर्यंत अर्ज वैध ठरत नाही, असे लटके यांच्या वकिलांनी सांगित. तर पालिका कुणाचाही राजीनाम्याचा अर्ज तातडीने स्वीकारत नाही, असे पलिकेच्या वकिलांकडून सांगण्यात आले. तर चौकशी होत राहील, तुम्ही राजीनामा स्वीकारा, अशी मागणी ऋतुजा लटके यांच्या वकिलांनी मुंबई महनगर पालिकेकडे केली.