पैसेवाटपाचा आरोप, कोटेचा यांना क्लीन चिट, जप्त केलेली रक्कम परत देण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 03:57 PM2024-05-22T15:57:41+5:302024-05-22T15:58:27+5:30

जप्त करण्यात आलेली रक्कम कोटेचा  यांच्या कार्यालयात कार्यालयीन खर्चासाठी ठेवली होती, असा निष्कर्ष काढत जप्त करण्यात आलेली रक्कम परत  द्यावी, असा निर्णय मुंबई उपनगर जिल्हा, रोख रक्कम सोडवणूक समितीने दिला आहे. 

Allegation of money sharing, clean chit to Kotecha, order to return seized amount | पैसेवाटपाचा आरोप, कोटेचा यांना क्लीन चिट, जप्त केलेली रक्कम परत देण्याचे आदेश

पैसेवाटपाचा आरोप, कोटेचा यांना क्लीन चिट, जप्त केलेली रक्कम परत देण्याचे आदेश

मुंबई : मतदानाच्या तीन दिवस आधी महायुतीचे उमेदवार मिहीर कोटेचा यांच्या मुलुंड येथील निवडणूक कार्यालयातून पैशांचे वाटप होत असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला होता. त्यावेळी दोन्ही गटांत जोरदार घमासान होऊन उद्धवसेनेच्या चार कार्यकर्त्यांना अटक झाली होती. पैसेवाटपाचे हे प्रकरण निवडणूक आयोगाकडे गेले होते. या प्रकरणी चौकशी, साक्षी आणि सुनावणी पूर्ण झाल्यानंतर आयोगाने कोटेचा यांना क्लीन चिट दिली आहे. जप्त करण्यात आलेली रक्कम कोटेचा  यांच्या कार्यालयात कार्यालयीन खर्चासाठी ठेवली होती, असा निष्कर्ष काढत जप्त करण्यात आलेली रक्कम परत  द्यावी, असा निर्णय मुंबई उपनगर जिल्हा, रोख रक्कम सोडवणूक समितीने दिला आहे. 

कोटेचा यांच्या कार्यालयातून पैसे वाटप होत असल्याचा आरोप करत उद्धवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयाकडे धाव घेतली होती. त्यावेळी भाजप आणि उद्धवसेनेचे कार्यकर्ते भिडले. त्यामुळे बराच काळ या भागात तणाव होता. अखेर पोलिसांनी रक्कम जप्त केली होती.   खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यावेळी  घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी गणेश डोईफोडे यांच्याकडून १ लाख ६४ हजार रुपयांची रक्कम जप्त केली होती. 

त्याबाबतचा अहवाल समितीकडे सादर करण्यात आला. डोईफोडे यांना मंगळवारी सुनावणीकरिता उपस्थित राहण्याची नोटीस बजावण्यात  आली होती. ते  कोटेचा यांच्या कार्यालयात सुपरवायझर म्हणून काम करतात. रक्कम कार्यालयीन खर्चासाठी ठेवण्यात आली, या आपल्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ त्यांनी कोटेचा यांचे बँक ऑफ इंडियाचे स्टेटमेंट सादर केले. त्यानंतर जप्त करण्यात आलेल्या रकमेचा कोणत्याही उमेदवारांशी किंवा राजकीय पक्षाशी किंवा निवडणूक प्रचाराशी संबंध नाही. त्यामुळे जप्त करण्यात आलेली रक्कम परत द्यावी, असा आदेश समितीने दिला.
 

Web Title: Allegation of money sharing, clean chit to Kotecha, order to return seized amount

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.