लग्नाच्या आमिषाने बलात्कार आरोप अग्राह्य; विवाहितेच्या तक्रारीवर उच्च न्यायालयाचे निरीक्षण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2024 08:33 AM2024-09-29T08:33:42+5:302024-09-29T08:34:24+5:30

तक्रारदार महिलेच्या म्हणण्यानुसार, आरोपी सतत तिला व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत होता. मात्र, आरोपीने तिचे सर्व आरोप नाकारले.

Allegation of rape by lure of marriage inadmissible; High Court observation on the complaint of the married | लग्नाच्या आमिषाने बलात्कार आरोप अग्राह्य; विवाहितेच्या तक्रारीवर उच्च न्यायालयाचे निरीक्षण

लग्नाच्या आमिषाने बलात्कार आरोप अग्राह्य; विवाहितेच्या तक्रारीवर उच्च न्यायालयाचे निरीक्षण

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : विवाहाचे प्रलोभन दाखवून बलात्कार केल्याचा आरोप विवाहित महिला करू शकत नाही, असे महत्त्वाचे निरीक्षण उच्च न्यायालयाने नुकतेच नोंदवले. बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने अटकेच्या भीतीने पुण्याच्या एका व्यक्तीने दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर करताना न्या. पितळे यांनी वरील निरीक्षण नोंदविले.

तक्रारदार महिलेच्या म्हणण्यानुसार, आरोपी सतत तिला व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत होता. मात्र, आरोपीने तिचे सर्व आरोप नाकारले. महिलेचे कोणतेही व्हिडीओ आरोपीने व्हायरल केले नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले. त्यामुळे ती बाब विचारात घेत न्यायालयाने शिंदेचा अटकपूर्व जामीन मंजूर केला.

आरोपीच्या वकिलाचा युक्तिवाद
‘आरोपी पोलिस तपासाला सर्व प्रकारचे साहाय्य करत आहे. त्याने मोबाइल फोन पोलिसांकडे जमा केला आहे. त्यामुळे महिलेने केलेल्या आरोपांच्या विश्वासार्हतेबाबत शंका आहे; कारण ती विवाहित आहे,’ असा युक्तिवाद शिंदेंच्या वकिलांनी केला; परंतु, सरकारी वकिलांनी मात्र आरोपीने तपासाला पूर्ण साहाय्य केले नसल्याचा दावा न्यायालयात केला. 

एकलपीठ काय म्हणाले?
‘तक्रारदार विवाहित आहे. विवाहाचे खोटे वचन देऊन आपल्याला बळी बनविण्यात आले, असा दावा ती करू शकत नाही. तक्रारदार विवाहिता असल्याने तिला माहीत होते की, ती अर्जदाराशी विवाह करू शकत नाही. शिवाय, अर्जदारही विवाहित पुरुष असल्याने प्रथमदर्शनी ‘लग्नाच्या खोट्या वचनाचा’ सिद्धान्त चुकीचा आहे,’ असे न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्या एकलपीठाने स्पष्ट केले. 

प्रकरण काय?
बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलेल्या विशाल शिंदे याने अटकपूर्व जामिनासाठी याचिका केली होती. तक्रारदार एक विवाहित स्त्री आहे आणि शिंदेही विवाहित आहे. या दोघांमध्ये आधी मैत्री झाली. त्यानंतर शिंदेने तिला विवाहाचे वचन दिले आणि तिच्याशी शरीरसंबंध ठेवले, असा आरोप आहे.

Web Title: Allegation of rape by lure of marriage inadmissible; High Court observation on the complaint of the married

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.