किशोरी पेडणेकरांच्या कंपनीवर आरोप; बेस्ट कंत्राटी कामगार पीएफ घोटाळा प्रकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2023 09:50 AM2023-03-01T09:50:04+5:302023-03-01T09:50:33+5:30
कुलाबा पोलिस अधिक तपास करत आहे. किशोरी पेडणेकर यांनी मात्र सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बेस्टच्या कंत्राटी चालक कामगार भरतीमध्ये कामगारांच्या पगारांसह त्यांच्या पीएफच्या रकमेवर डल्ला मारल्याप्रकरणी एम.पी. एंटरप्रायजेस ॲण्ड असोसिएशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीविरोधात मंगळवारी कुलाबा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एम.पी.ने हे कंत्राटी कामगारांच्या पगाराचे काम माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या किश कंपनीला दिल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत कुलाबा पोलिस अधिक तपास करत आहे. किशोरी पेडणेकर यांनी मात्र सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
बेस्ट चालक ऋषिकेश कदम यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, एप्रिल २०२१ मध्ये बेस्ट विभागात कंत्राटी पद्धतीवर चालक भरती सुरू असल्याची माहिती मिळताच वांद्रे बस डेपो येथे एम.पी. एंटरप्रायजेस ॲण्ड असोसिएशन प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडे मुलाखत व चाचणी दिली. त्यानंतर बस चालक म्हणून नियुक्ती झाली. पगार २१ हजार दाखवला. तसेच, भविष्य निर्वाह निधी व ईएसआय कट करून १८ हजार रुपये मिळत असे. नोव्हेंबर २०२१ पर्यंत ह्युमनिक कंपनीकडून पगार वेळेवर होत असताना, सर्व कारभार पुन्हा एम. पी. कंपनीकडे आला. पीएफबाबत तपासणी करत असताना खात्यात पीएफची रक्कम जमा होत नसल्याचे दिसून आले. याबाबत त्यांनी एम.पी. कंपनीकडे चौकशी केली तेव्हा लवकरच अपडेट होईल, असे आश्वासन दिले. मात्र, पैसे जमा झाले नसल्याचे कदम यांचे म्हणणे आहे.
२०१३ मध्येच कंपनी सोडली
तीन महिलांनी एकत्र येत किश कंपनी सुरू केली. मात्र, त्याकडे वेळ देता न आल्याने २०१३ मध्ये कंपनी सोडली. तसेच एम.पी. एंटरप्रायजेसचा कंपनीचा आम्हीही शोध घेत आहोत. कारण, त्यांनी आमच्या कंपनीचीही दीड कोटीची फसवणूक केली आहे. त्यामुळे मुद्दाम काही मुद्दे नाही म्हणून दबाव आणण्यासाठी खोटे आरोप करण्यात येत आहे. मात्र, आम्हीही घाबरणार नाही. दाखल गुन्ह्यातही माझ्या नावाचा किंवा किश कंपनीचा उल्लेख नाही. पोलिस याबाबत सखोल तपास करतील.
- किशोरी पेडणेकर,
माजी महापौर