Join us

शिवशाहीत स्कॅनिंगच्या कामात गैरव्यवहाराचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2015 1:23 AM

शिवशाही पुनर्वसन प्रकल्प मर्यादित कंपनीत स्कॅनिंगच्या कामात गैरव्यवहार झाल्याची तक्रार एका वरिष्ठ अधिकाऱ्यानेच व्यवस्थापकीय संचालकांकडे केली आहे

मुंबई : शिवशाही पुनर्वसन प्रकल्प मर्यादित कंपनीत स्कॅनिंगच्या कामात गैरव्यवहार झाल्याची तक्रार एका वरिष्ठ अधिकाऱ्यानेच व्यवस्थापकीय संचालकांकडे केली आहे. स्कॅनिंगचे काम सुरू होण्यापूर्वीच कंपनीने कंत्राटदाराला पैसे दिल्याने, या गैरव्यवहाराची कुजबुज कंपनीमध्ये रंगली असताना या प्रकरणाची चौकशी करण्याऐवजी, त्याकडे कानाडोळा होत असल्याने अधिकाऱ्यांकडूनच आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.कंपनीने २0१४ साली कार्यालयीन कागदपत्रांचे स्कॅनिंग करण्यासाठी निविदा मागविल्या होत्या. त्याला तीन कंपन्यांनी प्रतिसाद दिला, पण कंपन्यांनी सादर केलेल्या कोटेशनचे लिफाफे बंद स्वरूपात नसल्याचा, आरोप संबंधित अधिकाऱ्याने केला आहे. तीनही कंपन्यांपैकी हित इन्टरप्रायझेस या कंपनीला स्कॅनिंगचे काम देण्यात आले. स्कॅनिंगसाठी मंत्रालय दरसूचीनुसार 0.३६ पैसे असा दर निश्चित केला असतानाही, कंपनीने हित इन्टरप्रायझेसला १.९0 पैसे दराने काम दिले. संबंधित कंपनीची स्कॅनिंगच्या कामासाठी निवड करण्यापूर्वीच कंपनीला २ लाख ४५ हजार रुपये देण्यात आल्याचा आरोपही अधिकाऱ्याने केला आहे.कंपनीच्या स्कॅनिंगच्या कामासाठी प्रथम २ लाख ८0 हजार खर्च अपेक्षित होता, पण या कामासाठी ३0 लाख ९२ हजार ५३५ रुपये खर्च आल्याचे नस्तीमध्ये नमूद करण्यात आले आहे, तसेच स्कॅनिंग आणि डिजिटायझेशनच्या सॉफ्टवेअरमध्ये आजवर केवळ ५२,१७0 पृष्ठे अपलोड करण्यात आली आहेत, तर ५ लाख ७0 हजार ३८९ पृष्ठे स्कॅन झालेली नाहीत. या सर्व पानांच्या स्कॅनिंगसाठी कंपनीने ठरविलेल्या दरानुसार ११ लाख ८२ हजार ८६२ रुपये खर्च येणे अपेक्षित आहे, परंतु कंपनीने कंत्राटदाराला ३0 लाख ९२ हजार ५३५ रुपये अदा केले आहेत. मंत्रालय दरसूचीनुसार ही रक्कम २८.६८ लाख अधिक असल्याचेही या अधिकाऱ्याने तक्रारीत नमूद केले आहे.