भूषण कुमारांवरील लैंगिक शोषणाचे आरोप खोटे; 'त्या' महिलेचीच कबुली अन् माफी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2019 03:41 PM2019-01-17T15:41:49+5:302019-01-17T15:43:30+5:30
पोलिसात केलेली तक्रार मागे घेत असल्याची महिलेची माहिती
मुंबई: टी सीरिजचे मालक भूषण कुमार यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करणाऱ्या महिलेनं त्यांची माफी मागितली आहे. भूषण कुमार यांच्यावर आपण खोटे आरोप केल्याची कबुली या महिलेनं दिली. या प्रकरणी काल ओशिवरा पोलीस ठाण्यात दाखल केलेली तक्रार मागे घेत असल्याचं महिलेनं म्हटलं. त्यासाठी तिनं ओशिवरा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकांना पत्रदेखील लिहिलं आहे.
टी सीरिजचे मालक भूषण कुमार यांच्यावर त्यांच्या महिला सहकाऱ्यानं लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. या प्रकरणी तिनं काल ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रारदेखील दाखल केली होती. नोकरी देण्याच्या बहाण्यानं भूषण कुमार यांनी लैंगिक शोषण केल्याचा आरोप तिनं केला होता. 'भूषण कुमार यांच्यावर केलेल्या चुकीच्या आरोपांबद्दल मी माफी मागते. मी नैराश्यातून त्यांच्यावर आरोप केले. मला त्यांची प्रतिमा मलीन करायची नाही. मी भविष्यात त्यांच्यावर कधीही असे आरोप पुन्हा करणार नाही,' असं आरोप करणाऱ्या महिलेनं पोलिसांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.