लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई-आगामी लोकसभा,विधानसभा आणि पालिका निवडणुका शिवसेना-भाजप युती एकत्र लढण्याची घोषणा गृहमंत्री अमित शाह यांच्या दिल्लीच्या भेटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत केली.शिवसेनेत फूट पडल्यानंतर या निवडणुकांच्या तयारीला सर्वच प्रमुख राजकीय पक्ष लागले आहेत.देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत आगामी निवडणुकांमध्ये आपले अस्तित्व राहण्यासाठी शिंदे गटाने आतापासूनच कंबर कसली आहे.
कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार व शिवसेनेचे युवा नेते डॉ.श्रीकांत शिंदे यांनी मुंबईचे शिवधनुष्य पेलण्यासाठी मिशन मुंबई हा संकल्प हाती घेतला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमाणे ते रोज १८ ते २० तास काम करत आहेत.सध्या त्यांचा लोकसभा निहाय बैठकांचा सिलसिला सुरू असल्याचे चित्र आहे.
काल दुपारी डॉ.श्रीकांत शिंदे यांनी पालिका मुख्यालयात पालिका आयुक्त डॉ.इकबाल सिंह चहल यांची भेट घेवून मुंबईच्या अनेक प्रश्नांवर चर्चा केली.तर शिंदे गटातील १६ माजी नगरसेवकांची काल रात्री वर्षावर त्यांनी विशेष बैठक घेतली.या बैठकीत कोणते प्रकल्प पूर्ण होत आहेत,कोणते प्रकल्प अपूर्ण आहेत याची त्यांनी सविस्तर माहिती घेतली.
आगामी निवडणुका लक्षात घेता,मुंबईतील लोकसभा निहाय शिवसेना शाखांमध्ये भेटी देवून त्या भागाचा आढावा घेणे,शिवसैनिकांशी चर्चा करणे,बैठका घेणे,शिंदे-फडणवीस सरकारने गेल्या १० महिन्यातील कामगिरीचा लेखा जोखा मांडणे,त्यात्या भागातील प्रश्न समजून घेवून त्यांचे निराकरण करणे,मुंबईच्या विविध भागांमध्ये आपला दवाखाना सुरू करणे,अनेक विकास कामांचे भूमीपूजन-लोकार्पण करणे,शिंदे गट मुंबईतील उत्तर पश्चिम मुंबई,दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई या तीन लोकसभा मतदार संघात आपले उमेदवार उभे करणार असून लोकसभा निहाय शिंदे गटाच्या इच्छुक उमेदवारांची चाचपडणी करणे यावर डॉ.श्रीकांत शिंदे यांचा विशेष भर आहे.मिशन मुंबई अंतर्गत त्यांच्या अधिपत्याखाली पाच जणांची समिती नेमली असून ही समिती मुंबईतील विविध भागांना भेटी देत असल्याची माहिती सूत्रांनी लोकमतला दिली.