Join us

युतीचा तिढा सुटणार जेवणाच्या टेबलवर; मोदींचे उद्धव ठाकरेंना निमंत्रण

By संदीप प्रधान | Published: January 25, 2019 7:01 PM

भाजपा-शिवसेना या दोन्ही पक्षाच्या आगामी निवडणुकीतील युतीचा तिढा जेवणाच्या टेबलवर सुटण्याचे संकेत मिळत आहेत.

ठळक मुद्देयुतीचा तिढा जेवणाच्या टेबलवर सुटण्याचे संकेतमोदी व उद्धव यांच्यातील ही भोजनबैठक राजभवन किंवा एखाद्या पंचतारांकित हॉटेलमध्ये होण्याची शक्यता‘ठाकरे’ चित्रपटाचा विशेष खेळ दिल्लीत आयोजित केला जाणार

मुंबई : भाजपा-शिवसेना या दोन्ही पक्षाच्या आगामी निवडणुकीतील युतीचा तिढा जेवणाच्या टेबलवर सुटण्याचे संकेत मिळत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिल्लीत येऊन सोबत भोजन घेण्याचे निमंत्रण दिले असल्याचे उच्चपदस्थ सूत्रांकडून समजते. मात्र मोदी यांनी ‘मातोश्री’वर जेवणाकरिता यावे, असा शिवसेनेचा आग्रह असून कदाचित मोदी व उद्धव यांच्यातील ही भोजनबैठक राजभवन किंवा एखाद्या पंचतारांकित हॉटेलमध्ये होण्याची शक्यता आहे.

भाजपा-शिवसेना या दोन्ही पक्षातील संबंध उभय बाजूच्या नेत्यांच्या वक्तव्यामुळे बरेच ताणले गेले असून मोदी यांना हा तिढा सोडवायचा आहे. त्यामुळे त्यांनीच पुढाकार घेऊन उद्धव यांना दिल्लीत भोजनाकरिता बोलावल्याचे सूत्रांनी सांगितले. यापूर्वी रालोआच्या १० एप्रिल २०१७ रोजी दिल्लीत झालेल्या बैठकीत पंतप्रधान मोदी, उद्धव ठाकरे, चंद्राबाबू नायडू आदींनी एकत्र भोजन केले होते. दीर्घकाळ झाला रालोआच्या या दोन नेत्यांनी सोबत भोजन घेतले नाही व चर्चा केलेली नाही. मोदी यांचे निमंत्रण मातोश्रीने फेटाळलेले नाही. उलट मोदी यांनी मातोश्रीवर जेवण्याकरिता यावे, असा आग्रह धरला आहे. मोदी हे मातोश्रीवर येणे अशक्य आहे. मात्र मोदी आणि ठाकरे यांच्यात मुंबईत भोजनबैठक होऊ शकते. ही बैठक राजभवन किंवा उभय नेत्यांना सोयीच्या पंचतारांकित हॉटेलात होऊ शकते. यामुळे मोदींना मुंबईत येण्यास भाग पाडल्याचे ठाकरे यांना समाधान तर युतीचा तिढा सोडवताना हिमालय सह्याद्रापुढे पूर्णपणे झुकला नाही, असे सांगायला भाजपाचे स्वयंसेवक मोकळे राहतील.

पंतप्रधान मोदी व पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्यावर शिवसेनेच्या मुखपत्रातून दररोज टीका केली जात असली तरी खा. संजय राऊत यांनी निर्मिती केलेल्या ‘ठाकरे’ चित्रपटाचा विशेष खेळ दिल्लीत आयोजित केला जाणार आहे. यावेळी उद्धव ठाकरे हजर राहणार किंवा कसे ते स्पष्ट नाही. मात्र यावेळी पुढील भोजन बैठकीचे पक्के होऊ शकते. ठाकरे स्मारकाकरिता महापौर बंगला देणे, स्मारकाकरिता लागू होणारे १४ कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क माफ करणे वगैरे निर्णय घेऊन भाजपाप्रणीत सरकारने शिवसेनेचे मन जिंकण्याकरिता दोन पावले पुढे टाकली आहेत. भोजन बैठक ही तिढा पूर्णपणे सोडवण्याच्या दिशेने टाकलेले अंतिम पाऊल असेल, असे सांगण्यात येते. यापूर्वी जून २०१८ मध्ये पक्षाध्यक्ष अमित शहा यांनीही मातोश्रीवर पायधूळ झाडली होती.

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याच्या तोंडावर या सर्व घडामोडी घडतील, असे सूत्रांनी सांगितले. तत्पूर्वी दोन्ही पक्षातील नेते जागावाटपाची चर्चा पडद्याआड सुरु करतील. युतीचा तिढा सुटल्याची घोषणा ऐनवेळी करुन कुणालाही कुठेही पळापळ करण्याची संधी द्यायची नाही, याची खबरदारी दोन्ही पक्ष घेणार आहेत, असे सांगण्यात आले.

टॅग्स :नरेंद्र मोदीउद्धव ठाकरेशिवसेनाभाजपालोकसभा निवडणूक २०१९