Join us

युतीच्या घटक पक्षांना अर्धा टक्काही मते नाहीत

By admin | Published: May 02, 2015 5:03 AM

महापालिका निवडणुकीच्या जागा वाटपात शिवसेना-भाजपाने सापत्न वागणूक दिल्याने स्वबळाचा नारा देऊन १७ जागा लढणाऱ्या रामदास आठवलेंच्या रिपाइंला

नारायण जाधव, ठाणेमहापालिका निवडणुकीच्या जागा वाटपात शिवसेना-भाजपाने सापत्न वागणूक दिल्याने स्वबळाचा नारा देऊन १७ जागा लढणाऱ्या रामदास आठवलेंच्या रिपाइंला अवघी ९६१ मते मिळाली आहेत. रिपाइंपेक्षा मायावतींच्या बसपाने जास्त मते घेतली आहेत. तर महादेव जानकरांच्या राष्ट्रीय समाज पक्षास केवळ १२३ मते मिळाली आहेत. या दोन्ही पक्षांना अर्धा टक्काही मते न मिळाल्याने त्यांचे सर्वत्र हसे झाले आहे. रिपाइंने निवडणुकीत १११ पैकी १५ ते १७ जागा मागितल्या होत्या. शेवटी एकूण जागांच्या १० टक्के म्हणजे १० ते ११ जागा तरी द्याव्यात, अशी मागणी रिपाइंने केली होती. परंतु, तरी शिवसेना-भाजपाने त्यांना वाटाण्याच्या अक्षता लावल्या आणि रिपाइंसाठी एकही जागा सोडली नाही. त्यामुळे रिपाइंच्या नेत्यांनी स्वबळावर १७ जागांवर आपले उमेदवार उतरवले होते. या सर्व उमेदवारांना अवघी ९६१ मते मिळाली आहेत. त्यांच्यापेक्षा मायावतींच्या बसपाला या निवडणुकीत १०२४ मते मिळाली आहेत. दलित मतदारांनी निवडणूक प्रचाराच्या काळात रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांना काळे झेंडे दाखवून पक्षाविषयी रोष व्यक्त केला होता. अंतिम मतदार यादीतील एकूण ८ लाख १५ हजार ६७ मतदारांपैकी ३ लाख ९३ हजार ९७३ मतदारांनी मतदान केले.