युतीचं गणित ! शिवसेनेला 5 वर्षे उपमुख्यमंत्रीपद अन् समसमान मंत्रिपदे मिळणार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2019 06:10 AM2019-02-19T06:10:52+5:302019-02-19T06:11:11+5:30
यापुढील सर्व निवडणुका एकत्रित लढू - मुख्यमंत्री
मुंबई : नाणार प्रकल्प रद्द करण्यापासून विविध मुद्यांवर भाजपाला झुकवत शिवसेनेने अखेर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी भाजपासोबत युती केली. भाजपाध्यक्ष अमित शहा व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या चर्चेत युतीचा निर्णय झाला. त्यानुसार लोकसभेसाठी भाजपा २५ तर शिवसेना २३ जागा लढेल, असे ठरले. याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही
पक्षांसमवेत दिली.
विधानसभा निवडणुकीत मित्रपक्षांना सोडून उरलेल्या जागा समसमान लढण्याचा निर्णय झाला. ५ वर्षे दोन्ही पक्षांना समसमान मंत्रिपदे व अन्य जबाबदाऱ्या मिळतील, असे ते म्हणाले. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने २४, शिवसेनेने २0 आणि युतीच्या मित्रपक्षांनी चार जागा लढविल्या होत्या. कर्जमाफीचा फायदा पात्र शेतकºयांना मिळावा, ही उद्धव ठाकरे यांची मागणी मान्य करण्यात आली. त्यानुसार वंचित शेतकºयांबाबत आढावा घेऊन कर्जमाफी दिली जाईल. भविष्यात अमित शहा आणि उद्धव ठाकरे एकत्रितपणे घेतील तो निर्णय अंतिम असेल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. यावेळी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, पीयूष गोयल, अनंत गीते, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, आदित्य ठाकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई उपस्थित होते.
रत्नागिरी जिल्ह्यात उभारण्यात येणारा नाणार तेलशुद्धिकरण प्रकल्प कोणत्याही (पान ६ वर)
आम्ही एकत्र का येऊ नये? - उद्धव
शिवसेना-भाजपाला हरविण्यासाठी अविचारी पक्ष एकत्र येत आहेत. आम्ही तर तीस वर्षांपासून विचारांनी एकत्र आहोत मग आम्ही एकत्र का येऊ नये असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. ते म्हणाले की, राममंदिराच्या मुद्याला भाजपाचे समर्थन आहेच आणि केंद्राने वादग्रस्त जागा राममंदिरासाठी देऊ केली आहे. युतीमध्ये पाच वर्षात जे झाले, ते मी विसरणार नाही. त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून ते लक्षात ठेवणे आवश्यक आहे पण आता आम्ही नवीन सुरुवात करीत आहोत.
शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद!
आज झालेल्या चर्चेत शिवसेनेला पुढील पाचही वर्षे उपमुख्यमंत्रीपद देण्याचे ठरले, अशी माहिती सूत्रांनी दिली. मुख्यमंत्र्यांनी समान पदवाटप असा शब्द वापरल्याने सेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद मिळणार अशी चर्चा सुरू झाली पण विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्रीपद भाजपाकडे तर उपमुख्यमंत्रीपद सेनेकडे असे ठरले.