धारावीवर भगवा फडकविण्यासाठी युती होणे गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 01:13 AM2019-08-27T01:13:38+5:302019-08-27T01:13:41+5:30

मतांचे विभाजन रोखण्याचे आव्हान : शिवसेना, भाजपतील प्रमुख नेते निवडणूक लढविण्यास इच्छुक

Alliance is needed to victory in dharavi | धारावीवर भगवा फडकविण्यासाठी युती होणे गरजेचे

धारावीवर भगवा फडकविण्यासाठी युती होणे गरजेचे

Next

खलील गिरकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : एकेकाळी आशिया खंडातील सर्वांत मोठी झोपडपट्टी अशी ओळख असलेल्या धारावीची परिस्थिती अद्यापही फारशी बदललेली नाही. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील मोठमोठ्या दिग्गज आमदारांना पराभवाचा धक्का स्वीकारावा लागलेला असताना धारावीने मात्र नेहमीप्रमाणे काँग्रेसच्या प्रा. वर्षा गायकवाड यांनाच कौल दिला होता. पाच वर्षांत राजकीय परिस्थितीत बदल झाला असला, तरी गायकवाड यांच्यासमोर लढण्यासाठी शिवसेना व भाजपची युती होणे अत्यंत गरजेचे आहे, अन्यथा गायकवाड पुन्हा बाजी मारतील अशी शक्यता शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून वर्तवण्यात येत आहे.


काँग्रेसकडून वर्षा गायकवाड या मतदारसंघाचे २००४ पासून सलग तिसऱ्यांदा प्रतिनिधित्व करीत आहेत. २००९ मध्ये दुसऱ्यांदा निवडून आल्यानंतर त्यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली आहे. त्यांचे वडील एकनाथ गायकवाड यांनी १९८५, १९९० व १९९९ अशा तीन वेळी या मतदारसंघाचे विधानसभेत प्रतिनिधित्व केले आहे. २००४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी तत्कालीन लोकसभेचे अध्यक्ष मनोहर जोशी यांना पराभूत केले होते व ते जायंट किलर ठरले होते. गायकवाड घराण्याच्या माध्यमातून या मतदारसंघावर काँग्रेसचा वरचष्मा दिसून येतो. त्यांना आव्हान देण्याचा सातत्याने प्रयत्न झाला होता.


१९९५ मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर बाबूराव माने यांनी विजय मिळवला होता. माने हे शिवसेनेत सक्रिय असून २०१४ मध्ये त्यांनी शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. त्या वेळी त्यांना १५ हजार ३२८ मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता. माने यांनी धारावीकरांचे पुनर्विकासाचे स्वप्न पूर्णत्वास जाण्यासाठी व झोपडीधारकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला आहे. तिसºया क्रमांकावर भारतीय जनता पक्षाच्या उच्चविद्याविभूषित असलेल्या दिव्या ढोले यांनी धडक मारली होती. त्यांना २० हजार ७६३ मते मिळाली होती. पराभवाने खचून न जाता ढोले यांनी या मतदारसंघात आपले व्यक्तिगत कार्यालय थाटून धारावीकरांना केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न सुरू केला असून त्यांच्या सामाजिक कार्यामुळे त्यांना धारावीकरांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. शिवसेनेकडून माने पुन्हा इच्छुक आहेत तर भाजपकडून ढोले या मतदारसंघातून लढण्यासाठी पुन्हा इच्छुक असून भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना या मतदारसंघात लढण्याची तयारी करण्यास सांगितल्याचे त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

आठवलेंच्या आरपीआयचाही जागेसाठी दावा
या मतदारसंघात दलित मतदारांची संख्या निर्णायक असल्याने हा मतदारसंघ राखीव मतदारसंघ आहे. त्यामुळे या मतदारसंघावर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पक्षाने दावा केला आहे. २०१२ च्या महापालिका निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचा एकमेव नगरसेवक याच मतदारसंघातून निवडून आला होता. रिपब्लिकन पक्षातर्फे पक्षाचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनावणे यांचा प्रमुख इच्छुकांमध्ये समावेश आहे. त्याशिवाय स्थानिक जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ कासारे व साधू कटकेदेखील इच्छुक आहेत. रिपब्लिकन पक्षाला मिळालेल्या राज्यमंत्री पदासाठी सोनावणे यांना डावलण्यात आल्याने त्यांना विधानसभेला उमेदवारी देण्याबाबत पक्षात विचार सुरू आहे. त्यामुळे त्यांच्या नावाची पक्षात जोरदार चर्चा आहे.

पालिकेतील बलाबल : या विधानसभा मतदारसंघातील महापालिकेच्या ७ नगरसेवकांपैकी ४ नगरसेवक शिवसेनेचे, २ काँग्रेसचे व १ राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे. भाजपला महापालिका निवडणुकीत या ठिकाणी यश मिळविता आले नव्हते.
मुस्लीम मते निर्णायक : या मतदारसंघात मुस्लीम मतदारांचे प्रमाणदेखील निर्णायक आहे. दलित समाजातील मदिगा, चर्मकार, बौद्ध, ढोर समाजाचे या मतदारसंघात प्राबल्य आहे. चर्मोद्योग व इतर लघुउद्योगांवर प्रक्रिया करण्याचे अनेक कारखाने या परिसरात आहेत. त्यांना जीएसटी, नोटबंदी यासारख्या निर्णयांचा मोठा फटका बसला होता. या उद्योजकांना पुन्हा चांगले दिवस येण्यासाठी ठोस उपाययोजना आखण्याची मागणी मतदारसंघातून केली जात आहे.
 

धारावी पुनर्विकास प्रकल्पात नागरिकांना मोठी घरे देण्यासाठी आम्ही सरकारला भाग पाडले आहे. या प्रकल्पाची त्वरित अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. हा मतदारसंघ युतीमध्ये शिवसेनेकडे असल्याने शिवसेनेचा नैसर्गिक हक्क या मतदारसंघावर आहे. - बाबूराव माने, माजी आमदार, शिवसेना
गोरगरीबांच्या समस्या सोडविण्यासाठी काम सुरू आहे. स्थानिक आमदारांनी यासाठी प्रयत्न न केल्याने नागरिकांना वर्षानुवर्षे त्याच परिस्थितीत खितपत राहावे लागत आहे.
- दिव्या ढोले, २०१४ च्या भाजपच्या उमेदवार

Web Title: Alliance is needed to victory in dharavi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.