Join us

शिवसेनेसोबत युती राहिली पाहिजे; नितीन गडकरींचं ठाम मत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2018 1:03 PM

शिवसेना-भाजपाचं नातं म्हणजे तुझं माझं जमेना अन् तुझ्यावाचून करमेना, असं गडकरींनी म्हटलं

मुंबई: हिंदुत्वाच्या मुद्यावर असलेली शिवसेनेसोबतची युती टिकली पाहिजे, असं केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी म्हटलंय. शिवसेना आणि भाजपामध्ये सतत उडत असलेल्या खटक्यांच्या पार्श्वभूमीवर गडकरींना पत्रकारांनी प्रश्न विचारला होता. त्यावर बोलताना, शिवसेना आणि भाजपाचं नातं 'तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना', असं गडकरींनी म्हटलं. शिवसेना आणि भाजपाकडून वारंवार एकमेकांवर टीका केली जाते, याबद्दल मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत नितीन गडकरींना प्रश्न विचारण्यात आले. यावर मी दिल्लीला असल्यानं मराठी वृत्तपत्र फारशी वाचायला मिळत नाही, असं उत्तर गडकरींनी दिलं. सध्या देशभरात वाहतूक क्षेत्रात मोठमोठ्या प्रकल्पांची कामं सुरू आहेत. त्यामुळे इतर गोष्टींकडे पाहायला फारसा वेळ मिळत नसल्याचंही ते म्हणाले. मात्र शिवसेनेसोबतची युती कायम राहायला हवी, असं मत त्यांनी व्यक्त केलं. शिवसेनेसोबतची युती ही हिंदुत्वाच्या मुद्यावर आधारित आहे. त्यामुळे ती टिकायला हवी, असं गडकरींनी म्हटलं. 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या सभांमधून वारंवार 'एकला चलो रे'ची भूमिका मांडली आहे. यानंतर भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेनेसोबत युती होईल, असा विश्वास व्यक्त केला. मात्र यानंतरही शिवसेना स्वबळावर निवडणूक लढण्यावर ठाम आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांमध्ये मध्यस्ती करणार का, असा प्रश्न गडकरींना विचारण्यात आला. याला पक्षानं सूचना केल्यास शिवसेनेशी संवाद साधू, असं उत्तर त्यांनी दिलं. 

टॅग्स :नितिन गडकरीभाजपाशिवसेनानरेंद्र मोदीउद्धव ठाकरेराजकारण