ठाणे - विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेनेतील जागावाटपाचा तोडगा अंतिम टप्प्यात असून, भाजप व लहान मित्रपक्ष मिळून 162 जागा तर शिवसेनेने 126 जागा लढवाव्यात, असा नवा फॉर्म्युला आता समोर आला आहे. तो नवीन फॉर्म्युला दोन्ही बाजूंनी मान्य होण्याची शक्यता आहे. त्यातच, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी ठाण्यातील एका कार्यक्रमावेळी युतीबाबत शिक्कामोर्तब केलंय.
विधानसभेच्या 288 पैकी 126 जागा शिवसेनेला दिल्यास 162 जागा उरतात. त्यापैकी रिपाइं, रासप, शिवसंग्राम, रयतक्रांती संघटना अशा लहान मित्रपक्षांना भाजपने जागा द्याव्यात आणि उर्वरित जागा स्वत: लढाव्यात, असा नवा प्रस्ताव आजच्या चर्चेत भाजपकडून देण्यात आला. कालपर्यंत शिवसेनेला 120 जागा देण्याची तयारी दर्शविणाऱ्या भाजपने आणखी 6 जागा देण्याची तयारी आता दर्शविली आहे. भाजपने मित्रपक्षांना आठ जागा दिल्या, तर त्यांना स्वत:ला लढायला 154 जागा मिळतील. लहान मित्रपक्षांना आठपेक्षा अधिक काही जागा वाढवून दिल्या, तर त्या प्रमाणात भाजपच्या जागा कमी होतील. लहान मित्रपक्षांचे समाधान करण्याची जबाबदारी आता पूर्णपणे भाजपवर असेल.
राज्यात आज युती असून उद्याही युती कायम राहील, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. त्यामुळे भाजपा-सेनेची युती होणार का नाही, या प्रश्नाला तूर्तास अल्पविराम मिळाल्याचे दिसून येते. शिवसेना-भाजपाच्या युतीसोबतच मित्रपक्षांना एकत्रित घेऊन महायुती बांधण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. मात्र, लहान मित्रपक्षांनीही आपल्याच कमळ चिन्हावर लढावे, अशी भाजपची इच्छा आहे आणि त्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे संबंधित नेत्यांशी चर्चा करीत आहेत. कमळ चिन्ह घेतले तर निवडून येण्यासाठी तुमच्या उमेदवारांना फायदाच होईल, असे समजविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. रिपाइंचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी त्याबाबत आधीच नकार दिला आहे.दरम्यान, शिवसेना-भाजपा युतीबाबत उलट-सुलट चर्चा असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंनीच युती होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. ठाण्यातील कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, राज्यात आज युती आहे आणि उद्याही युती राहिल. त्यामुळे, युतीवर शिक्कामोर्तब झाले असं म्हणता येईल. तसेच, 2014 च्या निवडणुकीदरम्यान शिवसेनेने गुंडाळलेली शिवआरोग्य योजना पुन्हा नव्याने सुरू करुन महाराष्ट्र निरोगी बनवून दाखवू, असेही उद्धव ठाकरेंनी ठाण्यात बोलताना म्हटले. मला ठाण्यात कौटुंबीक वातावरण दिसतय. ठाण्यात पहिलं नाट्यगृह शिवसेनेनं दिलं. आता, कोणाला नाटकं करायची आहेत, त्यांना करू दया, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.