युती व्हेंटिलेटरवर!
By admin | Published: January 25, 2017 04:18 AM2017-01-25T04:18:08+5:302017-01-25T04:19:36+5:30
मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपा-शिवसेनेची युती आता व्हेंटिलेटरवर गेली आहे.
मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपा-शिवसेनेची युती आता व्हेंटिलेटरवर गेली आहे. कोणत्याही स्थितीत स्वबळावर लढा व भाजपाला त्यांची जागा दाखवूनच द्या, अशी एकमुखी मागणी शिवसेनेचे नेते, मंत्री, पदाधिकारी, शाखाप्रमुखांनी आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसोबत मातोश्रीवर झालेल्या बैठकीत केली. युतीच्या बाजूचे असलेले ठाकरे यांनीही ‘तुमच्या भावना माझ्यासाठी महत्त्वाच्या आहेत, पण निर्णय मला घेऊ द्या,’ असे उद्गार या बैठकीत काढल्याने, २६ जानेवारीच्या मेळाव्यात ते स्वबळाची घोषणा करतील, अशी शक्यता वाढली आहे.
‘दूध का दूध, पानी का पानी होऊ द्या’, शिवसेनेची ताकद किती? ते भाजपावाल्यांना कळलेच पाहिजे. ते ११४ जागा कशाच्या भरवशावर मागत आहेत? त्यांना उगाच बेडकी फुगवून बैल झाल्यासारखे वाटत आहे. मुंबई शिवसेनेचीच असल्याचे
त्यांना दाखवून द्या, असे साकडे सर्वच नेत्यांनी ठाकरे यांना मातोश्रीवर घातले. युतीबाबत आजच्या बैठकीत काय ठरले, हे कोणीही बाहेर सांगू नये. पक्षप्रमुख २६ तारखेला अंतिम घोषणा करतील, असे आजच्या बैठकीत बजावण्यात आले. (विशेष प्रतिनिधी)
शिवसेनेला दुखवायचे की नाही?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्लीत होते. मुंबईतील युतीबाबत पक्षश्रेष्ठींशी त्यांचे काय बोलणे झाले, यावरही युतीचा निर्णय अवलंबून असेल. पाच राज्यांतील आगामी निवडणुकांत भाजपाची कामगिरी फारशी चांगली राहण्याची शक्यता नाही.
अशा वेळी महाराष्ट्रातील जुना मित्र असलेल्या शिवसेनेला दुखवायचा निर्णय भाजपा घेईल का? हा प्रश्न आहे.
आजही चर्चा नाही
मातोश्रीवरील बैठकीतील नूर युती तुटली असाच होता. आता २६ तारखेच्या मेळाव्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात काही चर्चा झालीच, तर युती व्हेंटिलेटरवरून परत येऊ शकते. तेवढी शेवटची आशा उरली आहे. युतीबाबत आज दोन्ही पक्षांमध्ये कुठलीही चर्चा झाली नाही.
मुंबईतील एकही भाजपा नेता युती करण्याच्या बाजूचा नाही. २२७ जागा लढलो, तर शंभर जिंकू. शिवसेनेने समजा 100 ही जागा दिल्या, तर त्या सगळ्या जिंकता येणे शक्य नाही. त्यामुळे स्वबळावरच लढावे, असे या नेत्यांना वाटते.
227ची यादी तयार
स्वबळावर लढण्याच्या दृष्टीने शिवसेनेने २२७ उमेदवारांची यादी तयार ठेवली आहे. उद्या स्वबळाची घोषणा झाली, तर लगेच यादी जाहीर करण्याचीही आमची तयारी असेल, असे शिवसेनेच्या सूत्रांनी सांगितले. 114जागा भाजपाला देण्याचा प्रश्नच नाही. आपण ६० चा प्रस्ताव दिला आहे, त्यात फार तर पाच-दहा जागा वाढवून द्या. भाजपाचे फाजील लाड करू नका, असा आग्रह शिवसेनेच्या नेत्यांनी ठाकरे यांच्याकडे धरला.