मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी युती करण्यावर शिवसेना आणि भाजपात एकमत झाले असून सोमवारी भाजपाचे पक्षाध्यक्ष अमित शहा आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे संयुक्त पत्रकार परिषद घेऊन त्याची घोषणा करतील, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडताना उद्धव ठाकरे यांनी ‘यापुढे भाजपाशी युती करणार नाही’ अशी घोषणा केली होती. त्यानंतरही लोकसभा निवडणूक दोन्ही पक्षांनी एकत्र लढावी, असा भाजपाचा आग्रह होता; तर लोकसभेचे जागावाटप जाहीर करतानाच विधानसभा निवडणुकीचेही जागावाटप जाहीर करण्याचा शिवसेनेचा आग्रह होता. तो भाजपाने मान्य केला असून सध्याच्या चर्चेनुसार लोकसभेसाठी दोन्ही पक्ष प्रत्येकी २४ जागा लढवणार आहेत.
२०१४ च्या निवडणुकीत भाजपाने २४, तर शिवसेनेने २० जागा लढविल्या होत्या. चार जागांवर महायुतीतील घटक पक्ष लढले होते. भाजपाच्या ताब्यातील पालघर लोकसभा मतदारसंघ शिवसनेला देण्यास तो पक्ष राजी झाल्याचे समजते. त्या बदल्यात पालघर जिल्ह्यातील एक विधानसभा मतदारसंघ भाजपाला दिला जाण्याची शक्यता आहे. विधानसभेच्या १४५ जागा भाजपा, १४३ जागा शिवसेना लढवेल, असे सूत्र ठरल्याचे सांगण्यात येते. भाजपाच्या प्रमुख नेत्यांनी युतीच्या चर्चेसाठी येण्याची शिवसेनेची मागणीही मान्य झाली असून यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मातोश्रीवर जाऊन चर्चा केली होती, तर युतीच्या घोषणेसाठी पक्षाध्यक्ष अमित शहा स्वत: येणारआहेत. याखेरीजही शिवसेनेच्या काही महत्वाच्या मागण्या भाजपाने मान्य केल्याचे समजते.मुख्यमंत्र्यांची शिष्टाई यशस्वीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी आपला राज्यातील दौरा अर्धवट टाकून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमवेत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘मातपश्री’वर भेट घेतली होती. त्यातील तपशील लगेच जाहीर झाला नसला, तरी सकारात्मक चर्चा झाल्याचे फडणवीस यांनी सांगितले होते. त्यात युतीचा फॉर्म्युला अंतिम झाल्याचे आणि मुख्यमंत्र्यांची शिष्टाई यशस्वी झाल्याचे मानले जाते.