दहा हजार मास्कचे वाटप
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2020 06:33 PM2020-04-15T18:33:09+5:302020-04-15T18:33:34+5:30
मुंबईमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने विविध उपाययोजना राबवल्या आहेत.
दहा हजार मास्कचे वाटप
मुंबई : मुंबईमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने विविध उपाययोजना राबवल्या आहेत. दरवर्षी सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य विषयक उपक्रम राबवून समाजसेवा करणाऱ्या पार्क साईट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानेही आता गरजूंना मदत करण्यास सुरूवात केली आहे. मंडळातर्फे दहा हजार कापडी मास्क आणि माहिती पत्रक वाटण्यात आले आहेत.
पार्क साईट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने गेल्या ५८ वर्षाच्या कालखंडात गणेशोत्सव बरोबरच अनेक रक्तदान शिबिर, आरोग्य शिबीर, एस.एस.सी. व्याख्यानमाला, दिवाळी पहाट या सारखे अनेक उपक्रम यशस्वीपणे राबविले आहेत. या सर्व उपक्रमात आम्हाला देणगी देणारे स्थानिक रहिवाशी आणि व्यापारी वर्ग यांचा मोलाचा वाटा आहे. हेच समाज ऋण फेडण्याचा उद्देशाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मंडळाचावतीने उपक्रम राबवण्यात येत आहे, असे मंडळातर्फे स्पष्ट करण्यात आले. विक्रोळी अग्निशमन केंद्र, पार्क साईट पोलीस ठाणे, महापालिकेचे सार्वजनिक स्वच्छता राखणारे अधिकारी - कर्मचारी आणि आमच्या स्थानिक रहिवाशांना मोफत कापडी मास्क आणि माहिती पत्रक वितरित करण्याचा उपक्रम पार्क साईट, विक्रोळी पश्चिम येथे राबविण्यात आला, असे मंडळाच्यावतीने सांगण्यात आले.