मुंबई : आयपीएलसाठी वानखेडे, ब्रेबॉन, डी. वाय. पाटील या स्टेडियममध्ये २५ टक्केऐवजी ५० टक्के क्षमतेने प्रेक्षकांना प्रवेश देण्याची परवागी द्यावी, अशी मागणी भाजप आमदार आशिष शेलार यांनी सोमवारी विधानसभेत केली.विविध विभागाच्या मागण्यांवर चर्चा करीत असताना शेलार यांनी गावठाण, कोळीवाड्याच्या प्रश्नांसोबत मुंबईतील गृहनिर्माण सोसायट्यांच्या निवडणुका, मुंबईतील खेळाच्या मैदानांचे भाडेपट्टे आदी विषयांकडे सरकारचे लक्ष वेधले. शेलार यांनी मुंबईत होणाऱ्या आयपीएल सामन्यांसाठी स्टेडियममध्ये २५ टक्केऐवजी ५० टक्के क्षमतेची परवानगी देण्याबाबत विचार करावा, अशी मागणी केली. मुंबईतील ओव्हल मैदान, आझाद मैदान या मैदानावर नवीन खेळाडू तयार होतात. या मैदानांवरीव खेळपट्ट्यांचे भाडेपट्टे संपले असून, शासनाने या भाडेपट्ट्यांचे तातडीने नूतनीकरण करावे, अशी मागणी केली. मुंबईतील गावठाण, कोळीवाड्यांच्या सीमांकनाचे काम रखडले असून, याबाबत महापालिकेने महसूल विभागाचा अभिप्राय नसल्याचे स्पष्ट केले आहे. राज्यात भाजप सरकार असताना हे काम सुरू झाले होते, मात्र सध्या सीमांकन होत नाही. परिणामी मूळ मुंबईकरांच्या घरांचा पुनर्विकास होऊ शकणार नाही. त्यामुळे मुंबईतील सर्व गावठाण, कोळीवाड्यांचे सीमांकन तातडीने करावे, अशी मागणी शेलार यांनी केली.
आयपीएलकरिता ५०% प्रेक्षकांना परवानगी द्या; भाजप आमदार आशिष शेलारांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2022 7:45 AM