...मग सेना भवनातच आरतीला परवानगी द्या, मनसेचे थेट उद्धव ठाकरे यांना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2022 06:25 AM2022-04-13T06:25:15+5:302022-04-13T06:25:31+5:30
रामनवमीला मनसेने शिवसेना भवनसमोर हनुमान चालिसा लावल्याने प्रशासनाने कारवाईचा बडगा उभारला. शिवाय, शिवसेना नेत्यांनीही मनसेला आरतीचा सल्ला दिला.
मुंबई :
रामनवमीला मनसेने शिवसेना भवनसमोर हनुमान चालिसा लावल्याने प्रशासनाने कारवाईचा बडगा उभारला. शिवाय, शिवसेना नेत्यांनीही मनसेला आरतीचा सल्ला दिला. यावर, मग शिवसेना भवनातील भवानी मातेच्या मंदिरात आरतीची परवानगी देण्याची मागणी मनसेने केली आहे. त्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रही पाठविले आहे.
येत्या १६ एप्रिल रोजी हनुमान जयंतीच्या दिवशी शिवसेना भवनाच्या भवानी मातेच्या मंदिरात मनसैनिकांना हनुमान चालिसेसह आरती करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी मनसेचे दादर माटुंगा विभागाचे विभाग अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी हे पत्राद्वारे केली आहे. रामनवमीला मनसेने फिरविलेल्या रथावर कारवाई करण्यात आली. कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. यावरून, ज्यापद्धतीने काश्मीर मध्ये हिंदूवर अत्याचार झाले तसेच अत्याचार मुख्यमंत्री आमच्यावर करत आहेत, अशी आमची भावना झाली तर गैर काय? आम्ही सुद्धा हिंदू आहोत. सेना भवनला शिवसैनिक आणि मुख्यमंत्री मंदिर मानतात मग हनुमान चालिसा लावली तर इतका द्वेष का असावा. आम्ही हिंदुस्थानात आहोत की पाकिस्तानात हेच समजेनासे झालेय, असा प्रश्न यशवंत किल्लेदार यांनी उपस्थित केला आहे.
मनसैनिकांनी हनुमान चालिसा वाजविल्यावर तुम्हाला कारवाई का करावीशी वाटली? जर तुम्ही हिंदुत्ववादी आहात, मग सतत आम्ही हिंदुत्व सोडले नाही असे का बोलावे लागते याचे उत्तर आपण द्याल का? असे प्रश्नही किल्लेदार यांनी केले.