मुंबई : महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बॅनरबाजीवर अंकुश येण्याची शक्यता असल्याने नगरसेवकांचे धाबे दणणाले आहे. ‘शुल्क घ्या, पण बॅनरबाजीला परवानगी द्या’ असे म्हणत राजकीय बॅनरसाठी जागा निश्चित करण्याची जोरदार मागणी सर्वपक्षीय सदस्यांनी विधी समितीच्या बैठकीत केली आहे़ त्यामुळे राजकीय बॅनरबाजीवर निर्बंध घालण्यासाठी आणलेले धोरण पुन्हा एकदा खोळंबण्याची शक्यता आहे़मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पालिकेने शहरामध्ये बॅनरबाजीवर निर्बंध आणण्यासाठी धोरण ठरविले आहे़ या धोरणानुसार राजकीय व व्यावसायिक बॅनरबाजीवर बंदी प्रस्तावित आहे़ कार्यक्रम, मेळावे आणि अधिवेशनाच्या काळातच राजकीय पक्षांना बॅनरबाजीची संधी या धोरणात देण्यात आली आहे़ त्यातही १० बाय १० चौरस फुटांचे दोन फलक अशी मर्यादा घालण्यात आली आहे़ गणेशोत्सव तसेच नवरात्रौत्सवाचा काळातही जाहितरातबाजीवर बंदीची शिफारस या धोरणात केलेली आहे़ या धोरणाचा मसुदा विधी समितीच्या बैठकीत आज चर्चेसाठी मांडण्यात आला होता़ राजकीय पक्षांची फुकटची जाहिरातबाजी बंद होणार असल्याने या मसुद्यास सर्वपक्षीय सदस्यांनी जोरदार विरोध केला़ या मसुद्याला मंजुरी न देता पैसे घ्या, पण जाहिरात करण्याची परवानगी द्या, अशी मागणी सदस्यांनी या वेळी प्रशासनाकडे केली़ (प्रतिनिधी)बॅनरसाठी नियम- धर्मदाय आयुक्तांकडे नोंद असलेल्या धार्मिक आणि सामाजिक संस्थांच्या कार्यक्रमात १० बाय १० चौरस फुटांच्या दोन बॅनर्ससाठी एक महिन्याच्या जाहिरातींसाठी शुल्काच्या तीनपट रक्कम अनामत म्हणून भरावी लागणार आहे़- ईद व नाताळ अशा सणांसाठी बॅनर लावण्यासाठी एका व्यावसायिकाला कमाल २० फलकांना परवानगी देण्यात येणार असून, राजकीय पक्षांना मात्र जागा देण्यात येणार नाही़- गणेशोत्सव आणि नवरात्रौत्सवात मंडपापासून १०० मीटरपर्यंत व्यावसायिक जाहिराती करता येणार आहेत; मात्र यामध्येही राजकीय फलकांना स्थान मिळणार नाही़
‘बॅनरबाजीला परवानगी द्या’
By admin | Published: March 15, 2016 1:56 AM