लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दोन डोस घेतलेल्या नागरिकांना रेल्वेतून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र महापालिकेच्या वैधानिक व विशेष समितीच्या सभा अद्यापही प्रत्यक्ष न घेता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होत आहेत. त्यामुळे दोन डोस घेतलेल्या नगरसेवकांना प्रत्यक्ष सभांमध्ये उपस्थित राहण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी भाजपने पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्याकडे केली आहे.
कोरोना संकटामुळे सर्व वैधानिक, विशेष, प्रभाग समित्या आणि पालिका महासभांच्या बैठका ऑनलाइन होत आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेचा प्रसार नियंत्रणात आल्यानंतर काही महिन्यांनी सर्व सभा प्रत्यक्ष होऊ लागल्या. मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर पुन्हा सर्व सभा ऑनलाइन पद्धतीने होऊ लागल्या आहेत. मात्र व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणाऱ्या सभांमध्ये कोणता सदस्य काय बोलला? हे नीट ऐकू येत नाही. तसेच नगरसेवकांना त्यांच्या प्रभागातील समस्या मांडता येत नाहीत. महापालिका सभा व सर्व वैज्ञानिक समित्यांच्या सभा या आभासी पद्धतीने होत असल्याने पत्रकारांनादेखील या सभांमध्ये सहभागी होता येत नाही. त्यामुळे पारदर्शक कारभारासाठी या सभा प्रत्यक्ष सभागृहात घ्याव्यात, अशी विनंती भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी आयुक्तांकडे केली आहे.