मुंबई : भारत बायोटेक कंपनी उत्पादित करणाऱ्या कोव्हॅक्सिन लसीचे उत्पादन करण्याची परवानगी राज्याने केंद्राकडे मागितली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाने केंद्र शासन आणि इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चला लेखी निवेदन दिले आहे.
राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय यांनी सांगितले, भारत बायोटेक निर्मित करणाऱ्या कोव्हॅक्सिनचे उत्पादन हाफिकन संस्थेत करण्यास परवानगी मिळावी यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे. यासाठी भारत बायोटेकने साहित्य आणि तंत्रज्ञान साहाय्य केल्यास हाफकिनच्या मुंबई अथवा अन्य प्लांटमध्ये पुढील सहा महिन्यांत या लसीचे उत्पादन करण्यात येईल. यामुळे लसीच्या साठ्यात वाढ होण्यास मदत होईल. मात्र आता केंद्राकडून हिरवा कंदील मिळण्यासाठी हा प्रस्ताव प्रतीक्षेत आहे.
सध्या कोविशिल्डचा पुरवठा पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट करत असून, कोव्हॅक्सिनचा पुरवठा हैदराबाद येथील भारत बायोटेक कंपनी करीत आहे. कोव्हॅक्सिन लसीच्या उत्पादनास परवानगी दिल्यास लसीकरण प्रक्रियेला वेग येऊन तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण सोपे होईल, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
..................