गणेशोत्सवात ढोल पथकांना आगमन - विसर्जन मिरवणुकांमध्ये वाजवण्याची परवानगी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:09 AM2021-08-24T04:09:13+5:302021-08-24T04:09:13+5:30
मुंबई : गणेशोत्सवावरती यंदाही कोरोनाचे सावट असल्याने गणेशोत्सव निर्बंधात साजरा करावा लागणार आहे. यासाठी सरकारने नियमावलीदेखील जारी केली आहे. ...
मुंबई : गणेशोत्सवावरती यंदाही कोरोनाचे सावट असल्याने गणेशोत्सव निर्बंधात साजरा करावा लागणार आहे. यासाठी सरकारने नियमावलीदेखील जारी केली आहे. यात मिरवणुकांवर बंदी घातल्याने ढोल-ताशा पथकांचा मात्र हिरमोड झाला आहे; मात्र आता रुग्णसंख्या नियंत्रणात असल्याने गणेशोत्सवात ढोलताशा पथकांना आगमन व विसर्जन मिरवणुकांमध्ये वाजवण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी ढोलताशा पथक सरकारकडे करीत आहेत.
गणेशोत्सवातील मिरवणुका आणि ढोलताशा पथक यांचे वर्षानुवर्षांचे जुने नाते आहे. मागील काही वर्षांमध्ये ढोलताशा पथकाची क्रेझ वाढल्याने प्रत्येक शहरांमध्ये ढोलताशा पथक तयार झाले आहेत. आपल्या गणपतीचे पाटपूजन, आगमन किंवा विसर्जनाला ढोलताशा पथक पाहिजेच, असा गणेशभक्तांचा हट्ट असतो. या ढोल-ताशा पथकांना मिळणाऱ्या बिदागीमुळे दरवर्षी लाखोंची उलाढाल होत असते. मुंबईतील ढोलताशा पथकांमध्ये तरुणांचा समावेश जास्त आहे. तर पुण्यातील ग्रामीण भागातून येणाऱ्या पथकांमध्ये शेतकरी बांधवांचा समावेश असतो. यंदाच्या गणेशोत्सवात ढोल-ताशांवर हात घुमवायला मिळणार की नाही? असा प्रश्न सर्व ढोल पथकांना पडला आहे.
संदेश घोरपडे (वादक, निनाद ढोल पथक) - ऑगस्ट महिन्यात दरवर्षी गणपतीच्या पाटपूजन व आगमन सोहळ्यांचे वेध लागते. त्यामुळे मुंबईत रस्त्याच्या कडेला अथवा उड्डाणपुलांखाली ढोल-ताशांचा सराव सुरू होतो; मात्र यंदाही आम्हाला ढोल वाजवायला मिळणार नसल्याचे दिसून येत आहे. सरकारने कमी वादकांच्या उपस्थितीत ढोल वाजवण्यास परवानगी द्यायला हवी.
सुभाष तळेकर (अध्यक्ष, मुंबई डबेवाला असोसिएशन) - डबेवाल्यांचे ढोल पथक असल्याने डबेवाल्यांना गणेशोत्सवात उत्पन्नाचा आधार मिळतो. गेल्यावर्षी लॅाकडाउनमुळे ढोल-पथकांचा रोजगार बुडाला. यामुळे त्यांना आर्थिक फटका बसला. यावर्षी मुंबईत कोरोना आटोक्यात आहे, ही जमेची बाजू पहाता ढोल-पथकांना यावर्षी आगमन - विसर्जनाला सरकारने ढोल वाजवण्याची परवानगी द्यावी.