पालकांची उच्च न्यायालयात धाव
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अमेरिकेची नागरिक असलेल्या आपल्या १६ वर्षीय मुलीला कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी अमेरिकेत जाण्याची परवानगी द्यावी, यासाठी पालकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यावर न्यायालयाने राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले.
न्या. एस. एस. शिंदे व न्या. अभय आहुजा यांच्या खंडपीठाने राज्य सरकारला एका आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देश दिले. दक्षिण मुंबईचे रहिवासी विरल आणि बिजल ठक्कर यांनी त्यांच्या मुलीला अमेरिकेत कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी पाठवण्याकरिता उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
मुलीबरोबर तिची मावशी पूर्वी पारेख हिला ‘काळजीवाहू’ म्हणून अमेरिकेत पाठवण्याची विनंती पालकांनी केली. पालकांच्यावतीने ज्येष्ठ वकील मिलिंद साठे यांनी सांगितले की, मुलगी अमेरिकीही नागरिक आहे. त्यामुळे अमेरिकेत लस घेण्यास बांधील आहे. कोरोनामुळे अमेरिकेने भारतीयांना त्यांच्या देशात येण्यास तात्पुरती मनाई केली आहे. मात्र, अमेरिकेच्या नागरिकांना परवानगी आहे. अल्पवयीन अमेरिकन व्यक्तींच्या अमेरिकन नसलेल्या पालकांनाही परवानगी आहे.
सध्या भारतात १८ वर्षांखालील मुलांना लस देण्यात येत नाही. परंतु, अमेरिकेत १२ वर्षांपर्यंतच्या मुलांना लस देण्यात येतेे, असेही याचिकेत म्हटले आहे.
मंगळवारच्या सुनावणीत सरकारी वकील पूर्णिमा कंथारिया यांनी न्यायालयाला सांगितले की, याचिकाकर्त्यांनी केंद्र सरकार व अमेरिकन दूतावासाला प्रतिवादी करण्याचे निर्देश द्यावे.
नियमानुसार, दूतावासाला प्रतिवादी करता येणार नाही. परंतु, केंद्र सरकारला प्रतिवादी करेन, असे साठे यांनी म्हटले. न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणी पुढील आठवड्यात ठेवली आहे.