मशिदीवरील स्पीकर लावण्यास परवानगी द्या! मुस्लीम संघटनांची पोलीस आयुक्तांकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2022 09:49 AM2022-04-19T09:49:51+5:302022-04-19T09:50:51+5:30
मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांना निवेदन देण्यात आले आहे. मशिदीच्या ट्रस्टी व पदाधिकाऱ्यांनाही त्याबाबत तातडीने अर्ज करण्याचे आवाहन केले आहे.
मुंबई : मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी भोंग्याबाबत घेतलेल्या भूमिकेमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असताना मुस्लिम संघटनांनी त्याविरुद्ध आवाज उठविण्यास सुरुवात केली आहे. मशिदीवरील लाऊडस्पीकर पूर्ववत असून, ते कायम ठेवण्यासाठी जे अर्ज करतील त्यांना रीतसर परवानगी द्यावी, अशी मागणी ऑल इंडिया सुन्नी जमाते -ए-उलेमा व रझा अकादमीकडून करण्यात आली आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांना निवेदन देण्यात आले आहे. मशिदीच्या ट्रस्टी व पदाधिकाऱ्यांनाही त्याबाबत तातडीने अर्ज करण्याचे आवाहन केले आहे.
मशिदीवरील भोंग्याच्या विषयावरून राजकीय प्रतिक्रिया उमटत असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भविण्याची शक्यता आहे. त्याबाबत गृह विभाग व पोलिसांकडून उपाययोजना राबविल्या जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर सुन्नी जमायतुल उलमाचे महाराष्ट्रचे अध्यक्ष सय्यद मोनुउद्दीन मिया यांनी शिष्टमंडळासह आयुक्त संजय पांडे यांची भेट घेतली.