लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईतील दूध उत्पादकांची अडचण दूर करण्यासाठी सायंकाळच्या वेळातही दूध वितरण आणि विक्रीची मागणी माजी मंत्री कृपाशंकर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मुख्यमंत्री ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार उत्तम काम करत असल्याचे सांगत कृपाशंकर सिंह यांनी याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. तसेच, सध्या लागू असलेल्या लाॅकडाऊनमुळे सकाळी सात ते अकरा याच वेळात अत्यावश्यक दुकानांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र, मुंबई परिसरातील गोठ्यात दररोज सकाळी आणि संध्याकाळी गायी आणि म्हशींचे दूध काढले जाते. निर्बंधांमुळे सायंकाळच्या दूध विक्रीची मोठी अडचण होते. यावर राज्य सरकारने तोडगा काढण्याची मागणी कृपाशंकर सिंह यांनी केली आहे.
याशिवाय, घोषित केल्याप्रमाणे रिक्षाचालकांना प्रत्येकी १५०० रुपयांचे अनुदान वितरित करावे, रिक्षाचालकांप्रमाणे सुतार, माथाडी, हमाल अशा गरीब वर्गालाही मदतीचा हात द्यावा, अशी मागणीही सिंह यांनी पत्रात केली आहे.
...........................................