लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्तमानपत्र विक्रेत्यांना फक्त होम डिलिव्हरीसाठी परवानगी दिली आहे. मुळात बहुतांश घरी टाकणारे पेपर कोविडमुळे बंद झाले. उरलेला व्यवसाय स्टॉलवर आहे; पण बहुतांश ठिकाणी पोलीस होम डिलिव्हरीचा आदेश दाखवून स्टॉल बंद करीत आहेत. त्यामुळे जसे वडापाव विक्रेते व इतर व्यावसायिकांना स्टॉल लावून पार्सल देण्याची परवानगी देण्यात आली आहे तशीच वर्तमानपत्र स्टॉलधारकांनाही स्टॉल लावण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी मुंबई ठाणे वृत्तपत्र विक्रेता एकीकरण समितीकडून करण्यात आली आहे.
अशाप्रकारे आदेश काढून वृत्तपत्र विक्रेत्यांना दिलासा द्यावा, जेणेकरून विक्रेत्यांना त्रास कमी होईल. वर्तमानपत्रांच्या माध्यमातून शासनाने काढलेले नियम जनतेपर्यंत पोहोचवण्याचा काम हा घटक करत असतो, या घटकावर घटकावर अन्याय होता कामा नये, अशी विनंतीही मुंबई ठाणे वृत्तपत्र विक्रेता एकीकरण समितीचे ठाणे येथील अजित पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.
...................