‘वृत्तपत्र विक्रेत्यांना अत्यावश्यक सेवा म्हणून रेल्वे प्रवासाची परवानगी द्या’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2020 02:10 AM2020-10-08T02:10:34+5:302020-10-08T02:10:41+5:30
वृत्तपत्र विक्रेत्यांना रेल्वेमध्ये प्रवेश देण्यास रेल्वे प्रशासनही तयार असले तरी तेही राज्य सरकारच्या अध्यादेशाच्या प्रतीक्षेत आहे.
मुंबई : अनलॉक ५ नंतर बहुतेक सेवा सुरू झाल्या आहेत. मात्र अद्यापही मुंबईची लाईफलाइन असलेल्या लोकलमध्ये वृत्तपत्र विक्रेत्यांना प्रवेश मिळालेला नाही. परिणामी वृत्तपत्र विक्रेत्यांना अत्यावश्यक सेवा म्हणून रेल्वे प्रवासाची परवानगी द्या, अशा आशयाचे निवेदन बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघाने मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना दिले आहे. महापौरांनी सदर निवेदन राज्य सरकारला पुढे पाठवून दिले आहे. तर दुसरीकडे वृत्तपत्र विक्रेत्यांना रेल्वेमध्ये प्रवेश देण्यास रेल्वे प्रशासनही तयार असले तरी तेही राज्य सरकारच्या अध्यादेशाच्या प्रतीक्षेत आहे.
कोरोनाला हरविण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनला आता सहा महिने उलटले आहेत. या काळात बंद करण्यात आलेल्या बहुतांश सेवा अनलॉकदरम्यान सुरू होत आहेत. मात्र आजही वृत्तपत्र विक्रेत्यांना रेल्वेमध्ये प्रवेश मिळालेला नाही. विशेषत: कोरोना, लॉकडाऊनच्या काळात वृत्तपत्र विक्रेते सुरुवातीपासून कार्यरत आहेत. आता मुंबई आणखी वेगाने धावत आहे. अशा वेळी वृत्तपत्र विक्रेत्यांना अत्यावश्यक सेवा म्हणून रेल्वेमध्ये प्रवेश दिला पाहिजे. यासाठी आता बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघाने वृत्तपत्र विक्रेत्यांना अत्यावश्यक सेवा म्हणून रेल्वे प्रवासाची परवानगी मिळण्याबाबत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना निवेदन दिले आहे.
कोरोना महामारीमुळे रेल्वे सेवा सामान्य माणसांसाठी बंद केली आहे. वृत्तपत्र व्यवसायाला सरकारने अत्यावश्यक सेवा म्हणून परवानगी दिली आहे. अनेक वृत्तपत्र विक्रेते मुंबईत जागेचे भाव गगनाला भिडले असल्याने व परिवार मोठा होत असल्याने विरार, नालासोपारा, ठाणे व मुंबई उपनगरात वास्तव्यास आहेत. वृत्तपत्र व्यवसायाला परवानगी असूनही मुंबईत पहाटे येण्यासाठी रेल्वे सुविधा नसल्यामुळे अनेक वृत्तपत्र विक्रेत्यांच्या परिवारावर उपासमारीची वेळ आली आहे. लाखो मुंबईकरांना वृत्तपत्र हवे असतानाही वृत्तपत्र विक्रेत्याला आपली सेवा देता येणे दुरापास्त झाले आहे. तरी आपण मुंबईचे प्रथम नागरिक म्हणून मुंबईतील वृत्तपत्र विक्रेत्यांना त्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याशी चर्चा करून अत्यावश्यक सेवा म्हणून वृत्तपत्र विक्रेत्यांना रेल्वे प्रवासाची सुविधा देण्यासाठी प्रयत्न करावा, असे निवेदनात म्हटले आहे.
महापौरांना निवेदन देताना बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघाचे विश्वस्त जीवन भोसले, वृत्तपत्र विक्रेता शंकर रिंगे, राजेंद्र चव्हाण, अमोल खामकर आदी उपस्थित होते. आता महापौरांना देण्यात आलेले निवेदन पुढे पाठविण्यात आले आहे. तर रेल्वे प्रशासनही वृत्तपत्र विक्रेत्यांना रेल्वेमध्ये प्रवेश देण्यास तयार आहे. मात्र यासाठी राज्य सरकारने अध्यादेश काढावा किंवा तसे आदेश राज्य सरकारने द्यावेत. त्यानंतर रेल्वे प्रशासन वृत्तपत्र विक्रेत्यांना रेल्वेमध्ये प्रवेश देईल, अशी माहिती संघाकडून देण्यात आली.